Wednesday, April 24, 2024

सुंदर माझं घर ..... (७)

 

साधारण संध्याकाळच्या सुमारास विल्मिंग्टनला येऊन पोहोचलो. एका मित्राच्या घरी राहिलो आणि तिथूनच सकाळी उठून आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये आलो. आमचे सर्व सामान अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या ऑफीस मध्ये आम्ही यायच्या आदल्या दिवशीच येऊन पडले होते. आम्ही तशी विनंती केली होती की प्लीज आमचे सामान ठेवून घ्या. आम्ही लगेचच येत आहोत. अपार्टमेंट वरच्या मजल्यावर होते. घरामध्ये जाण्याचा जिना बाहेरूनच होता. सर्व खोकी, बॅगा, डेस्क टॉप, (computer) टिव्ही, एकेक करत आमच्या अपार्टमेंटमध्ये विनायकने व त्याच्या मित्राने वाहून आणले. मी बाकीच्या छोट्या बॅगा आणल्या. सकाळी सकाळीच जिना चढण्या उतरण्याचा भरपूर व्यायाम झाला. सामान उचलून उचलून अंगदुखीमध्ये आणखी भर पडली. नंतर विनायकने जवळच असलेल्या दुकानातून दूध आणले. चहा साखर, डाळ तांदुळ, कणीक आम्ही आमच्याबरोबरच आणले होते. चहा प्यायल्यावर जरा थोडे बरे वाटले. हॉलमध्ये सर्व सामान होते. थोडावेळ जरा आडवे झालो आणि मग नंतर जवळच असलेल्या पिझ्झा हटमध्ये जेवण करून आलो. एकेक करून परत खोक्यांवर चिकटवलेल्या चिकटपट्या काढल्या आणि सामान काढले. स्वयंपाक घरातले सामान पटापट लावून घेतले. रिकाम्या जागेत परत एकदा नव्याने संसार मांडायला सुरवात झाली.


या अपार्टमेंट मधले स्वयंपाकघर सी आकाराचे होते आणि मला खूपच आवडले होते. समोरासमोर ओटे आणि दोन ओट्यांच्या मधे इलेक्ट्रिक शेगड्या होत्या आणि त्याखाली ओव्हन. या ओव्हन मध्ये मी शेंगदाणे भाजायचे. एकदा नानकटाई व दोन प्रकारची बिस्किटे पण केली होती, प्रमाण माझे मीच ठरवले, समोरच्या ओट्याच्या कोपऱ्यात आम्ही आमचा मायक्रोवेव्ह ठेवला होता. स्वयंपाकघराला लागूनच हॉल होता आणि या दोघांमध्ये अर्धी भिंत होती. त्यामुळे मला भाजी चिरता चिरता समोर असलेला टिव्ही पहाता यायचा. या स्वयंपाकघराला एक छोटी खिडकी होती. स्वयंपाक करता करता सहजच खिडकीतून डोकावले जायचे. एखाद् दुसरी बाई स्ट्रोलरमध्ये बाळाला बसवून चालत जाताना दिसायची. हॉलला आणि स्वयंपाकघराला लागूनच डाव्या बाजूला दोन मोठ्या बेडरूम होत्या. हॉलच्या एका बाजूला काचेची सरकती दारे होती. ही काचेची दारे आणि प्रवेशाचे दार उघडे ठेवले की, हवा खूप खेळती राहायची आणि म्हणूनच आम्ही एक गुबगुबीत खुर्ची या जागेच्या आणि पर्यायाने खेळत्या हवेच्या मधोमध ठेवली होती. या खुर्चीवर खास हवा खाण्याकरिता म्हणून बसणे व्हायचे.


आमच्या आणि आमच्या शेजारच्या अपार्टमेंटला मिळून मोठी बाल्कनी होती आणि मधोमध जिना होता. काही वेळेला मी जिन्यात बसून चहा पीत रहायचे. उन्हाळ्यात वाळवणं केली, वाळवणं केली म्हणजे अगदी भाततुकलीच्या खेळामधली, 2 बटाट्याचे पापड, 1 वाटीचा गव्हाचा चीक करून त्याच्या कुरडया केल्या. 1 वाटी साबुदाण्याच्या चिकवड्या तर 2 वाट्या तांदळाच्या फेण्या करून वाळवल्या. फेण्या करण्याकरता जो स्टॅंड लागतो तो माझ्याकडे नाहीये म्हणून मी कूकरची भांडी उपडी करून तांदुळाच्या पिठाची पापडी गिरवली होती. या घरात आम्ही सर्व जरूरीपुरते लाकडी सामान विकत घेतले. हॉल मध्ये सोफासेट, त्याला लागूनच एक गुबगुबीत खुर्ची. सोफ्याच्या समोर एक छोटे कपाट की ज्यामध्ये वर मोठा टिव्ही ठेवला होता व त्याखालच्या कप्यात व्हीसीआर व त्या खालच्या कप्यात गाण्यांच्या व सिनेमांच्या कॅसेटी, जास्तीचे बल्ब व इस्त्री पण ठेवली होती. मास्टर बेडरून मध्ये मोठा बेड, एक कपाट ज्याला एक मोठा आरसा होता. दुसऱ्या बेडरूम मध्ये एक कॉट होती. कॉटच्या शेजारी चाक असलेले टेबल ज्यावर डेस्कटॉप होता आणि टेबलाच्या उजव्या बाजूला सीपीयु ठेवला होता. शिवाय डेस्कटोपच्या बाजूला एक प्रिंटरही ठेवला. हॉलमधल्या सोफ्याच्या मागे ६ जणांचे डायनिंग टेबल व ६ खुर्च्या होत्या. त्याला लागूनच एक ट्रेड मिल आणली होती. या घरात वॉशर ड्रायरचे कनेक्शन होते त्यामुळे वॉशर-ड्रायर धुणे धुण्याकरता विकत घेतले होते.


या घराच्या मास्टर बेडरूम मध्ये एक अडगळीची खोली होती. त्यात मी भारतावरून आणलेल्या ४ बॅगा ठेवल्या होत्या. त्यानंतर तिथे एकेक करत गोष्टी साठत गेल्या. त्यामध्ये वापरते असले तरी डिव्हिडी, वीसीअर, टिल्लू टिव्ही, बिघडलेला मिक्सर, फूड प्रोसेसर वगैरे. दुसऱ्या बेडरूम मध्ये जे भिंतीतले कपाट होते तिथल्या दांडीवर आमचे सर्व कपडे लटकवलेले असायचे. खाली एका खोक्यात मी बरेच प्लॅस्टीकचे डबे व बरण्या ठेवत असायचे. इथे सर्व प्लॅस्टीकच्या डब्यामध्ये मिळते त्यामुळे त्यातले काही संपले की तो डबा मी स्वच्छ करुन ठेवायचे. फेकवत नसे. आम्ही बाहेरगावी फिरायला गेलो की मधे वाटेत पोळी भाजी, लाडू चिवड्यासाठी या डब्यांचा मला खूप उपयोग व्हायचा. उन्हाळ्यात आम्ही ढोली कलिंगडे आणायचो. ती कापून ठेवण्याकरताही या डब्यांचा मला उपयोग होत असे.
घराच्या प्रत्येक खोलीत सीलिंग फॅन होते. सीलिंग फॅन आमच्या दोघांसाठी खूप महत्त्वाचे होते. ऐन थंडीत हिटर लावलेला असतानाही डोक्यावर फिरणारा पंखा आम्हाला हवाच असतो आणि म्हणूनच मला हे घर जास्त आवडले होते. घराच्या दोन्ही बाजूला बाल्कन्या आणि खेळती हवा ही तर अजूनच मोठी जमेची बाजू होती. स्वयंपाकघराला लागून जी बेडरूम होती ती पुढे पुढे माझीच होऊन गेली होती. तिथे बसून मी जे काही सुचेल ते लिहायचे. कधीकधी मध्यरात्री उठून या दुसर्या बेडरूममध्ये यायचे. कंप्युटर वर याहू मेसेंजर डाऊनलोड केला होता. मनोगत या संकेतस्थळावरून व ऑर्कुट वर झालेल्या मैत्रिणींशी भरपूर गप्पा व्हायच्या. या बेडरूमच्या बाहेर अनेक हिरवीगार झाडे होती. पहाटेच्या सुमारास या झाडांवरच्या पक्ष्यांंची किलबिल सुरू व्हायची. खिडकीतून बाहेर पाहिले, तर काही वेळेला आकाशात रंग जमा झालेले असायचे. मग लगेच मी कॅमेरा घेऊन बाल्कनीत उभे राहून सूर्योदय होण्याची वाट पाहत बसायचे. बाल्कनीत उभे राहिले की, उजव्या बाजूला सूर्योदय दिसायचा, तर डाव्या बाजूला सूर्यास्त. दुपारच्या वेळी हॉलमधल्या सोफ्यावर बसलेली असताना काही वेळा अंधारून यायचे आणि मुसळधार पावसाला सुरुवात व्हायची. सरकत्या काचेच्या दारातून मुसळधार पावसाला बघत राहायचे मी. या दोन्ही बाल्कन्यांच्या कठड्यावर अनेक पक्षी येऊन बसत. या घरातला हॉल इतका मोठा होता की, रात्रीच्या जेवणानंतर बाहेर जायचा कंटाळा आला की, हॉलमध्येच शतपावली घातली जायची.


याच घरात आमच्या लग्नाची २५ वर्षे पूर्ण झाली. त्यादिवशी मी पुरी, बटाट्याची भाजी, भजी, शेवयाची खीर आणि ओल्या नारळाची चटणी असा बेत केला होता. त्यादिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्या दोघांच्या आवडीचा पाऊस झिमझिमत होता. एका वर्षी खूप हिमवृष्टी झाल्याने जिन्यात बराच बर्फ साठला होता. खाली उतरण्यासाठी कठड्याला धरून भुसभुशीत बर्फात पाय रोवून सावाकाशीने उतरले आणि जिन्याच्या एका बाजूला बर्फाची बाहुली, माणूस आणि बाई बनवली. पानगळीच्या सीझन मध्ये इथे काही झाडे पानांचा रंग बदलतात. एकदा एका झाडाखाली बरीच पाने पडलेली दिसली. खाली उतरून प्रत्येक रंगाचे एकेक पान घेऊन घरात आले आणि डिशमध्ये ठेवले. लगेचच एक कल्पना सुचली की हीच पाने दोऱ्यात ओवली तर ! पाने दोऱ्यात ओवली आणि ते पानांचे तोरण मी दाराला लावले. या घरात आलो तेव्हा मनोगत या नावाचे मराठी संकेतस्थळाचे आम्ही दोघे सदस्य झालो. या संकेतस्थळावर अनेक कविता, लेख, चर्चा येत. मनोगतावर रोजचे वाचणे सुरू झाले. मला आवडलेल्या लेखांवर, कवितेवर मी प्रतिसाद देत असे. नंतर तिथे पाककृती विभाग सुरू झाला आणि माझे रेसिपी लेखनही सुरू झाले. नंतर मी अमेरिकेत आलेले अनुभव व भारतातल्या आठवणी लिहायला सुरवात केली. त्यानंतर माझे दोन ब्लॉग सुरू करून तिथेही लिहायला लागले. याहू मेसेंजर वर मनोगतावरचे आणि ऑर्कुटवरचे मित्रमैत्रिणी जमा झाले. हे सर्व भारत,अमेरिका, जर्मनी, इंग्लड मधले होते. साधारण ७० ते ८० मराठी मंडळ जमा झाले होते.
सकाळी उठल्या उठल्या आम्ही जेव्हा कंप्युटर ऑन करायचो तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणी ना कोणी बोलत असायचे. त्यामुळे आम्हाला आम्ही एकटे आहोत असे अजिबात जाणवले नाही. विल्मिंग्टन मध्ये भारतीय अगदी क्वचित दिसायचे.



प्रत्यक्षातले मित्रमंडळ १० वर्षे झाली तरीही नव्हते. विनायकचे ऑफीस कारने मोजून ५ मिनिटांच्या अंतरावर होते त्यामुळे तो घरी जेवायला यायचा.
ऑर्कुटवरच्या दोन ग्रुपवर होते ते डिपेंडंट विसा वर असणाऱ्या बायकांचे होते. या दोन्ही ग्रुपची मी सदस्य असल्याने तिथे जेव्हा काही पदार्थांच्या पाककृतींची विचारणा व्हायची तेव्हा मी माझ्या ब्लॉगवरच्या त्या पदार्थांची लिंक द्यायचे. तिथे मी पाककृती स्पर्धेत भाग घेत होते. एका ग्रुप मध्ये माझी इडली विजेती ठरली व इतर काही पदार्थ उपविजेते ठरले. अजून २ गाण्यांच्या ग्रुप मध्ये आम्ही दोघेही सदस्य होतो. तिथे रोजच्या रोज गाण्यांची थीम असायची. त्या थीमनुसार युट्युबवरच्या गाण्यांची लिंक द्यायचो. त्याकरता आमच्या दोघांची हजारोंनी गाणी युट्युबवर बघितली गेली.याच घरात छोटे वादळ आले होते आणि काही सेकंदाचा भुकंपही अनुभवला. या घरात टिव्ही खूप पाहिला गेला. डीश नेटवर्क घेतल्याने अमेरिकन्स चॅनल सोबत आम्ही भारतीय ३ चॅनल्स घेतले होते. सोनी, झी सिनेमा आणि सहारा वन. तिथल्या काही मालिका मला अजूनही आठवत आहेत. त्या अनुक्रमे "एक लडकी अंजानी सी" " हरे काँच की चुडियाँ" "वो रहनेवाली महलोंकी" "साँस बिना ससुराल" "वैदेही" शिवाय झी सिनेमावर हिंदी सिनेमे पाहण्यातही छान वेळ जायचा. या घरातल्या स्वयंपाकघरात सणासुदीच्या दिवशी साग्रसंगीत पदार्थ केले जायचे आणि नैवेद्याचे ताट वाढून मी फोटोकरिता हॉलमध्ये यायचे. हॉलमध्ये असलेल्या गुबगुबीत खुर्चीवर ताट ठेवून फोटो काढायचे. पदार्थांचे फोटो काढण्याकरिता हा स्पॉट जणू ठरूनच गेला होता. कालनिर्णय वर कोणता सण आहे ते बघायचे आणि त्यादिवशी आमच्या घरातले वातावरण सणमय होऊन जायचे. उठल्या उठल्या आवरून सणाच्या तयारीला लागायचे. त्यादिवशी मी सणासुदीला शोभतील असे पदार्थ करायचे. स्वैपाक करताना दोन्ही ओट्यांवर पसारा असायचा माझा. काकडी चोचवताना सोललेली सालं, एका ताटात उकडलेले बटाटे करून त्याच्या फोडी, मिक्सर वर केलेली चटणी. भज्यांची कढई, एका परातीत पुऱ्यांची कणीक, खीरीचे पातेले असे पसारा घालून नैवेद्याचे एका ताटात वाढून फोटो काढायला सज्ज असायचे. दुपारच्या जेवणाला विनायक घरी यायचा आणि म्हणायचा वाढ मला, जेवून लगेच निघायचे आहे. मी म्हणायचे एक दोनच मिनिटं, नैवेद्याच्या ताटाचा फोटो काढते आणि तेच ताट तू घे. जेवून लगेचच विनू ऑफीसला जायचा व माझेही जेवण होत आलेले असायचे. नैवेद्याच्या ताटाचा काढलेला फोटो आधी ओर्कुट व नंतर फेबूवर टाकायचे. नंतर थोडी पलंगावर पाठ टेकायचे. २ तास विश्रांती घेऊन मग ओट्यावरचा पसारा आवरून,ओटा घासून पुसून स्वच्छ करायचे व भांडी घासून डीश वॉशरला लावायचे. नंतर मायक्रोवेव्ह मधून बनवलेला चहाचा एकेक घोट घेतला की जरा तरतरी यायची. रात्रीच्या जेवणाला दुपारचे जे उरलेले असेल ते बघून थोडा भात लावायचे. आईला फोन करून काय काय केले तेही सांगायचे. तिलाही आनंद व्हायचा.



विल्मिंग्टन पासून भारतीय वाणसामानाचे दुकान खूपच दूरवर असल्याने मी २/३ महिने पुरेल असे सर्व सामान आणून ते ओट्याच्या वर असलेल्या कपाटांमध्ये भरून ठेवायचे. अगदी गोटा खोबऱ्यापासून ते चिंच गूळ, चुरमुरे, फरसाण सर्व काही. त्यामुळे मी घरच्या घरी सर्व काही करत असे. भेळपुरी, रगडा पॅटीस, इडली सांबार, मसाला डोसा, दिवाळीतले सर्व पदार्थही करत होते. पाणीपुरीच्या पुऱ्या करायची मात्र हिंम्मत झाली नाही. २००५ सालापासून ते २०११ पर्यंत मी एकेक करत सर्व पदार्थ केले. पदार्थाची कृती मनोगत व ब्लॉगवर लिहायचे व सोबत त्या पदार्थाचा फोटोही अपलोड करायचे. एकदा घरी चक्का पण केला होता. विरजण लावलेले दही कॉटनच्या कपड्यात ओतून ते कुठे लटकवायचे हे काही केल्या कळत नव्हते. शेवटी सुचले की इस्त्री करायचा बोर्ड होता त्याच्या खालच्या लोखंडी पट्यांवर ते टांगले आणि खाली पातेले ठेवले.खाण्याचे सर्वच्या सर्व पदार्थ माझ्या ब्लॉग वर तुम्हाला वाचायला मिळतील. या अपार्टमेंट कॉप्लेक्सच्या आवारातच एक तळे होते. त्या तळ्यावर माझी रोज एक चक्कर असायची. या तळ्यात अनेक बदके होती. कितीतरी बदकपिल्लांचे जन्म या तळ्यावर झाले. तळ्यावर बगळे, करकोचे व हिवाळ्यात सीगल्स पक्षी यायचे. हे सीगल्स खूपच दंगा करायचे. . या तळ्यात तीन चार मोठाली कासवे व छोटे मासेही होते. या घरात डिजिटल कॅमेराने फोटोग्राफी सुरू झाली आणि हजारोंनी फोटो काढले. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे फोटो मी हवामानतज्ञ ली रिंगरला पाठवायचे. त्यातले काही फोटो त्याने वेदर शॉट ऑफ द डे मध्ये दाखवले.



याच घरात आमची नवी कोरी करकरीत दुसरी कारही आली. याच घरात विनायकने ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आणि ६ महिन्यांच्या आत विनायकचे व माझे ग्रीन कार्ड घरी आले. विनायकला Extraordinary Ability या category मध्ये ग्रीन कार्ड मिळाले आणि मी त्याची बायको म्हणून मला. नंतर ५ वर्षानी अमेरिकेचे नागरीकत्वही मिळाले. सुरवातीची ५ वर्षे ऑनलाईन मित्रमंडळींशी गप्पा मारल्या. रेसिपी आणि इतर लेखनही केले. हळूहळू मित्रमंडळ पांगायला लागले. मनोगत या संकेतस्थळावर पूर्वीसारखी मजा उरली नाही. त्यानंतर ऑनलाईन कोर्सेस केले आणि घराच्या बाहेर पडले. पब्लिक लायब्ररीत ३ वर्षे voluntary काम केले. कॉलेज मध्ये जाऊन Paralegal Diploma च्या २ सेमेस्टर केल्या. या घरात अभ्यास करतानाचे दिवस अजूनही आठवतात. पण शिक्षण मध्येच सोडावे लागले. नंतर नशिबाची चक्रे बदलली आणि विनायकच्या दुसऱ्या नोकरीनिमित्ताने आम्ही हेंडरसनविल शहरात आलो. हे शहर उंच पर्वतावर होते. सर्व डोंगराळ प्रदेश होता. आम्हा दोघांना निसर्ग खूप आवडतो. त्यामुळे आम्ही या शहरात खूपच रमून गेलो होतो. डोंगरमाथ्यावरच्या घरातील आठवणी घेऊन येईनच. तोपर्यंत वाचत रहा. Copy Right - Rohini Gore

क्रमश : ...

Tuesday, April 23, 2024

२३ एप्रिल २०२४

 

गोष्ट एका अळूवडीची 🙂

अळू म्हणले की मला तरी लग्नातल्या पंगतीतली अळूची भाजी आठवते. वरण भात, त्यावर साजूक तूप, बटाट्याची भाजी, भजी, आणि अळूची भाजी. हे जे काही मिश्रण आहे ना ते खूपच भावतं बाई मला. 🙂 त्याची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत रहाते. अळूवडी भारतात कधीही केली नाही मी. मला पालेभाज्या खूपच आवडतात. त्यात मुळा, पालक,आणि शेपू तर आहाहा ! असे मी रोजच्या जेवणात करायचे. पण अळूची भाजी अगदीच एखाद वेळेस केली असेल. अळूची वडी ! ना बाबा ना ! खूपच लांबलचक कृती आहे. मला अशा पाककृती नाही आवडत. तर झाले काय की शनि-रवि च्या ग्रोसरी डे मध्ये आम्हाला कधी नव्हे ते अळू दिसले इंडियन स्टोअर मध्ये. तसे तर ते काही वर्षांपूर्वीही दिसले होते आणि आणून खास मनोगत दिवाळी अंकाकरता अळूवडी केली लिहीली आणि सुपूर्तही केली होती. फोटोबिटो पण काढला.


एका गठ्यात १०-१२ पाने आली यावेळेस. शेपूच्याही २ जुड्या घेतल्या. आता इतकी अळूची पाने घेतल्यावर लगेच्यालगेच करणे आलेच ! 🙁 नाहीतर फ्रीजमध्येच वाळून गेली तर ना होईल अळूची वडी ना होईल भाजी. मला एक प्रश्न पडतो अळूची भाजी आणि फदफदं एकच ना ! 😃 की काही वेगळी कृती आहे? काही म्हणा पण अळूचं फदफदं हे नाव मला आवडले. फळभाजी म्हणजे कशी शिजवून, वाफून, परतून केलेली. फदफदं म्हणजे गिरगिट्ट असे काहीतरी ! तर मंडळी काल रात्रीच मी अळूची वडी करणार होते. त्याकरता चिंचही भिजत घातली. काय करू काय करू म्हणत २/४ वेळा अळूची पाने फ्रीजच्या बाहेर काढली आणि उद्या करायची का म्हणून परत फ्रीज मध्ये ढकलली. झोपताना पाण्यात भिजलेली चिंच ही फ्रीज मध्ये गेली. आज सकाळी उठल्या उठल्या सर्व आवरून झाल्यावर तयारीला लागले. पाने पाण्यात हलकेच घालून पेपर टॉवेलने त्यावरचे पाणी टिपून घेतले. चिंच गुळाचे पाणीही तयार केले. त्याची चव घेतली. आंबटगोड चव छान वाटली. ही पाने पण भली मोठी होती. अळूवडी करायला माझ्याच ब्लॉगवरची मीच लिहिलेली पाकृ वाचली. हरबरा डाळीच्या पिठात लाल तिखट, धनेजिरे पूड, थोडे तीळ, मीठ व चिंच गुळाचे पाणी घालून पीठ भिजवले. पानाला भिजवलेले पीठ फासण्या आधी चव बघा बर का ! नाहीतर ओम फस होइल. 😃 चव म्हणजे कशी तिखट, आंबट, गोड, आणि आळणी नको. नाहीतर त्या वड्यांना काही अर्थ नाही उरणार.


हे पीठ कसे हवे माहीत आहे? आपण हाताला मेंदी कशी फासून लावतो इतपत पाहिजे. घट्ट नको की सैलही नको. पानाला सर्व बाजूने लावता आली पाहिजे. एकावर एक पाने आणि प्रत्येकाला पीठ फासले. बरं इतकेच करून चालत नाही बर का ! ते दोन्ही बाजूने गुंडाळून परत पीठ फासावे लागले. नंतर चहू बाजूने गुंडाळी करून प्रत्येक गुंडाळीला पीठ हवेच हवे. एक मोठी गुंडाळी करून सुद्धा वर पीठ हवे. किती ते काम ! 😃 नंतर गुंडाळीचे दोन भाग करून ते कूकरच्या भांड्यात उकडत ठेवले. पोळी भाजी खाऊन जरा थोडी आडवी झाले. पण करमते का? लक्ष सगळे त्या अळूवडीत. कशी झाली असेल? बिघडते की काय ही उगीचच शंका. उठल्यावर कूकरचे झाकण काढून ती गुंडाळी गार करत ठेवली. पूर्ण गार होण्याची वाट पहात बसले रेडिओ वरची गाणी ऐकत. गार झाल्यावर लगेच त्याच्या वड्या पाडून तळल्या ! आज एकेकाचे फोटोही काढले. आंबटगोड वड्या मस्त झाल्या आहेत. अळूवडीत पूर्ण दिवस गेला. उरलेल्या चिंचगुळाच्या पाण्यात संध्याकाळी खायला भेळ केली. नंतर सोप्पा मेनु रात्रीच्या जेवणाचा केला आहे.


मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ आणि भात. आज रात्री आणि उद्या दुपारच्या जेवणाला हाच बेत. अळूवड्या, उसळ, भात दही. एकूणात आत्तापर्यंत मी दोन वेळाच अळुवड्या केल्या आहेत. आता फदफदंही होईलच. त्याची पाकृ लिहायची बाकी आहेच. तर मंडळींनो तुम्हाला चहासोबत किंवा जेवणा आधी असे काय खायला आवडते ज्याने भूक चाळवेल व मुख्य जेवणाचा जास्त चांगला आस्वाद घेता येईल? अळूवडी, कोथिंबीर वडी, ढोकळा, सुरळीची वडी, भजी की अजून काही? मत नोंदवायला विसरू नका हं. copy right - rohini gore
गोष्ट संपली. 😃

आजच्या दिवसाची रोजनिशीही झाली.
२३ एप्रिल २०२४






Thursday, April 18, 2024

सुंदर माझं घर ..... (६)

क्लेम्सनमधल्या कॉलेज ऍव्हेन्युच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये संध्याकाळच्या सुमारास आम्ही राहायला आलो. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे सर्व सुखसोयीने सज्ज असलेली फक्त एकच खोली! त्या खोलीमध्ये आमच्या मोठाल्या बॅगा व काही सामान ठेवले आणि तिथेच असलेल्या एका खुर्चीवर बसल्या बसल्या संसाराला लागणारे सर्व सामान एकाच खोलीत कसे काय लावायचे याचा विचार डोक्यात चालू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि त्या खोलीत चौफेर नजर फिरवली. सुरुवात तर करू म्हणजे आपोआप सुचेल असा विचार करत कामाला लागले. सर्वात प्रथम नव्या कोऱ्या गादीवर नवी कोरी चादर अंथरली व बेडरूम तयार केली. उशांना अभ्रे घातले. या चादर व अभ्र्यांचे उद्घाटन या स्टुडिओमध्ये होणार होते तर! या नव्या कोऱ्या गादीचा योगही आमच्याकडेच होता. क्लेम्सनमध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा एका भारतीय कुटुंबाकडे आठ दिवस राहिलो होतो. त्या मैत्रिणीचे घर मोठे होते. त्या जागेत आधीचा राहणारा कुणीतरी ही आकाशी रंगाची गादी अशीच सोडून गेला होता. ती मैत्रीण म्हणाली, "ही गादी आम्ही वापरत नाही तर तुम्ही घेऊन जा. चांगली आहे. तुम्हाला नवीन घरात उपयोगी पडेल. " गादी नवीकोरी दिसत होती म्हणून घेऊन आलो. त्याचप्रमाणे या स्टुडिओमध्ये एक खुर्ची अशीच कोणीतरी सोडून गेले होते. विद्यापीठात फर्निचर असेच फिरत असते. एक तर कोणी विकत घेत नाही, घेतले तर मित्रमैत्रिणींना फर्निचर देऊन जातात. ते बरोबर घेऊन जाण्यासाठीचा खर्च इथे जास्त असतो. तेव्हा बसायला खुर्ची आणि झोपण्यासाठी गादी तयार झाली.


आमच्याकडे पहिलावाहिला खरेदी केलेला जो टेलिव्हिजन होता तो ठेवण्याकरता स्टूलवजा काहीतरी घ्यायला हवे होते. काय घ्यावे आणि कोणत्या दुकानात जावे ते ठरवून तिसऱ्या दिवशी दुकानात जायला बाहेर पडले. त्या दिवशी अगदी मनासारखी खरेदी झाली. एक छोटा लाकडी टीपॉय घेतला आणि प्लॅस्टिकचे तीन ड्रॉअर असलेला कपाटवजा स्टँड घेतला. टीपॉयवर एक अभ्रा अंथरला आणि त्यावर आमचा १३ इंची टिल्लू टीव्ही ठेवला. त्या टीपॉयच्या खाली एक कप्पा होता, तिथे आमचा व्हिसीआर ठेवला व त्यावरती सिनेमांच्या कॅसेटी ठेवल्या. टीव्हीच्या आजूबाजूला रिकामी असलेली जागा ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांसाठी निश्चित केली. टीव्ही विराजमान झाल्यावर त्या खोलीला थोडे रूप आले. त्या खोलीत जी खुर्ची होती तिचे पाय अर्धगोलाकार होते त्यामुळे ही खुर्ची खूपच आरामदायी होती. या खुर्चीवर बसले की ती थोडी डुलायची पण ! ज्याला झोपून टीव्ही बघायचा आहे तो गादीवर आडवा व्हायचा व ज्याला बसून टीव्ही बघायचा आहे तो खुर्चीवर बसायचा. "वन बीएचके इन वन रूम" साकार होत होते. भारतामध्ये काही जणांचे एका खोलीतले संसार पाहिले होते आणि ते नीटनेटके होते. आमची एका खोलीत संसार करण्याची ही पहिलीच वेळ होती. नवीन अनुभव होता. क्लेम्सन मध्ये आम्हाला अपार्टमेंट मिळायला वेळ लागला. सर्व अपार्टमेंट कॉम्प्लेक्स विद्यार्थ्यांनी सेमेस्टर सुरू होण्या आधीच बुक करून ठेवली होती ! स्टुडिओ अपार्टमेंट जे आम्हाला मिळाले होते ते जणू काही आमच्याकरताच राखून ठेवले होते की काय? असे वाटले.


प्लॅस्टिकचा कपाटासारखा दिसणारा स्टँड आवडला म्हणून आणला पण याचे काय करायचे, काय ठेवायचे यामध्ये, काही सुचत नव्हते आणि एकदा अशीच गादीवर आडवी पडलेली असताना एकदम सुचले. चटदिशी उठले आणि जे सुचले होते ते लगेच करूनही टाकले. त्या प्लॅस्टिकच्या छोट्या कपाटात पहिल्या कप्यात मी महत्त्वाची बिले ठेवण्याकरता जागा केली. दुसऱ्यात नेलकटर, स्टेप्लर, कात्री, पट्टी, पत्रावर चिकटवण्याचे स्टँप असे सर्व काही ठेवले. सर्वात खालच्या कप्यात भारतातून आणलेल्या जुन्या हिंदी गाण्यांच्या कॅसेट ठेवल्या. सर्वात वरती भारतातून आणलेले छोटे घड्याळ ठेवले आणि शिवाय फोनही ठेवला. या छोट्या कपाटाची जागा मी टीपॉयच्या बाजूला केली व त्याच्या बाजूला आमचा बेड. सकाळी उठताना घड्याळात किती वाजले हे सहज दिसायचे. त्या स्टँडचा रंग निळा होता. त्याचे मी मनातल्या मनात खूप कौतुक केले. ध्यानीमनी नसताना आवडले आणि घेतले, आणि त्याचा इतका छान उपयोग होत आहे ते पाहून खूप आनंद झाला.
या जागेत मला सर्वात जे काही आवडले असेल ते म्हणजे या खोलीचे दार आणि या दाराला लागूनच असलेले दुसरे जाळीचे दार! या जाळीच्या दाराला एक मोठा आडवा हूक होता तो मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला छोट्या गोल हुकामध्ये अडकवला की मुख्य दार सताड उघडे ठेवले तरी चालायचे. जागेत हवा यायला हेच दार होते. बाकी सर्व बाजूंनी खोली बंद होती. मी अनेकदा हवा खेळती राहण्यासाठी हे दार उघडे ठेवायचे व जाळीच्या दारातून समोर असलेली हिरवळ बघायचे. याच जाळीच्या दारातून रपारप पडणाऱ्या पावसाकडे बघायला मला खूप छान वाटायचे. या घराच्या दरवाज्याला लागूनच एक ओसरी होती. पाऊस पडताना ओसरीच्या बाहेर पावसाच्या पागोळ्या पडायच्या. ओसरीवर उभे राहिले की अगदी कोकणातले वातावरण तयार व्हायचे. सर्व बाजूंनी हिरवीगार झाडी, ओसरी, मुसळधार पाऊस, पाऊस पडत असताना छतावरचे पाणी ओघळून बनलेल्या असंख्य पागोळ्यांकडे बघत बसावेसे वाटायचे. काही वेळेला पावसाचा अधिक आनंद लुटण्यासाठी आले घातलेल्या गरम चहाचा कप हातात असायचा. मन आपोआप गाणे गुणगुणायचे - खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू! या खोलीच्या एका भिंतीला एक भली मोठी खिडकी होती. पूर्ण काच असलेल्या खिडकीला जाळ्या होत्या व काचेची सरकती दारे होती. या सरकत्या दारातून हवा येण्यासाठी मी खिडकी काही वेळा अर्धी उघडी ठेवायचे. या खिडकीला पडदे मी घरीच शिवले. दुकानातून नाजूक फुले असलेले कापड आणले व सुई-दोऱ्याने टिपा घालून छान पडदे शिवले. दुपारचे जेवण झाले की गादीवर बसून मी काही वेळा काहीतरी लिहीत बसले की मधूनच नजर खिडकीबाहेरच्या उंच व काटकुळ्या झाडांकडे जायची. लिहायचा कंटाळा आला की पडदे लावून अंधार करून थोडा वेळ आडवी व्हायचे. थोडी डुलकी लागायची. झोपताना जाळीचे दार लावून मुख्य दार थोडे किलकिले करून ठेवायचे. बाहेरून कोणी आले की दरवाज्यावरची बेल वाजवायचे. जेव्हा उठून दार उघडायला जायचे तेव्हा मैत्रीण आलेली असायची व हळू आवाजात विचारायची "सो रहे थे क्या? ". काही वेळेला मैत्रिणीला बोलावून घ्यायचे व आम्ही दोघी पडदे लावून अंधार करायचो. बाहेरचा प्रकाश अंधुक होऊन घरात पसरायचा व व्हिसीआरवर एखादा हिंदी चित्रपट बघायचो. जणू काही थिएटर मध्ये चित्रपट बघत आहोत असेच भासायचे. तो बघून झाला की आम्ही दोघी मिळून चहा प्यायचो.


या चौकोनी घराला स्वयंपाकघर असे नव्हतेच. एका भिंतीला लागून एक ओटा, त्यातच इलेक्ट्रिकच्या शेगड्या, आणि भांडी धुण्याकरता एक भले मोठे सिंक होते. इलेक्ट्रिक शेगडीच्या खाली ओव्हन, ज्यामध्ये मी भांडी एकात एक घालून ठेवली होती. ओट्याला लागून जे ड्रॉवर होते तिथे भांडी, वाट्या, झारे, कालथे, सुऱ्या ठेवल्या. त्या ओट्याशेजारी फ्रीज आणि त्याला लागूनच बंद एक छोटी खोली ज्यामध्ये बाथ-टब वगैरे होते. बाथरूम मध्ये धुणे धुण्याची व भांडी घासण्याची साबणे, एअर फ्रेशनर असे सिंकच्या खाली असलेल्या कपाटात ठेवले. शिवाय तिथे लाँड्री बॅगही ठेवली. स्टुडिओमध्ये वॉशर ड्रायर नसल्याने धुणे बाहेर असलेल्या लाँड्रोमॅटमधून (laundromat) धुऊन आणायला लागायचे. दर शनिवारी सकाळी विनायक धुणे धुवायच्या दुकानात कपडे घेऊन जायचा. मी त्याला एका भल्या मोठ्या पिशवीमध्ये सर्व कपडे घालून द्यायचे. त्यात एका रूमालात धुणे धुवायची पावडर व एका रूमालात क्वार्टर डॉलर्सची नाणी (जी धुणे धुण्यासाठी लागायची) ती बांधून द्यायचे. हे दुकान आमच्या घरापासून थोडे चालत गेले की एक वाहता रस्ता ओलांडून गेल्यावर होते. स्वयंपाकघराच्या वरच्या दोन फळकुटांवर काही डबे, बरण्या व जास्तीचे तेल साखर ठेवली. चहा साखरेचे डबे ओट्यावरच ठेवले. भांडी घासायला जे सिंक होते त्यात भांडी जमा झाली रे झाली की लगेच घासून पुसून ठेवायला लागायची. ओट्यावरच जुनी चादर घालून घासून विसळलेली भांडी उपडी घालायचे. उपडी घातल्याने भांडी लगेचच कोरडी व्हायची व ती परत जागेवर ठेवायला लागायची. पसारा घालण्यासाठी अजिबात वाव नव्हता. घराच्या चार भिंतींच्या कडेने एकेक खोली तयार झाली. सुरवातीच्या भिंतीला प्रवेशाचे दार आणि खिडकी. समोरच स्वयंपाकघर. आता उरलेल्या समोरासमोरच्या दोन भिंतींमध्ये एकाला तर लागूनच गादी होती आणि उरलेल्या भिंतीला जे अनेकविध खोलगट कप्पे होते त्यात बाकीचा संसार मावायचा होता.


हे कप्पे तीन भागांमध्ये बसवले होते. डाव्याउजव्या बाजूचे जे भाग होते त्यांना दारे होती, म्हणजे आत जे काही ठेवले असेल ते दिसायचे नाही. उजव्या बाजूला जो भाग होता तो तर चक्क कपाटासारखाच होता, त्यामुळे त्यात सर्वच्या सर्व कपडे राहणारच होते. तिथे हँगर ठेवायला एक दांडा होता. त्यावर नेहमी वापरातले कपडे हँगरला लटकवले. आणि त्या खाली जी रिकामी जागा होती तिथे आमची भली मोठी बॅग ठेवली. ज्याप्रमाणे ऋतू बदलतील त्यानुसार योग्य ते कपडे बाहेर काढून हँगरला लटकवायचे व बाकीचे अनावश्यक कपडे बॅगेत ठेवायचे. बाजूला असणाऱ्या जागेत जास्तीची पांघरुणे, रग व चादरी ठेवल्या. सर्वात वरच्या कप्प्यात टिशू पेपर, पेपर टॉवेल असे ठेवले. खाली एका कडेला व्हॅक्युम क्लीनर ठेवला.
डाव्या बाजूच्या भागात जे कप्पे होते त्यात उरलेल्या दोन बॅगा ठेवून सर्वात खालचा कप्पा बूट, चपला ठेवण्यासाठी केला. मधला एक कप्पा रिकामा होता तोही पुढे उपयोगात आला. संसाराला लागणाऱ्या सर्व गोष्टी एकेक करत मांडत गेले आणि माझी मीच थक्क झाले. एवढे सर्व सामान लागून सुद्धा मधली चौकोनी जागा घरातल्या घरात फेऱ्या मारायला रिकामी होती. त्या भिंतीत आता उरला होता तो मधला भाग! हा भाग स्वयंपाकघरात रांधा-वाढा यासाठी लागणाऱ्या किराणामालासाठी लागणार होता. खूप नाही तरी दोन तीन महिने पुरेल इतके सामान आणायला झाले होते. आमच्यासारखीच दोन तीन भारतीय कुटुंबे या स्टुडिओ अपार्टमेंट संकुलामध्ये राहत होती.


आम्ही तिघी मैत्रिणी एकमेकींकडे जायचो तेव्हा एकमेकींच्या खोल्यांचे कौतुक करायचो. प्रत्येकीची मांडणी वेगवेगळी. त्यातल्या त्यात खोलीची केलेली सजावटही छान होती. त्यातल्या एका मैत्रिणीने मला विचारले की "आपण दोघी मिळून ऑनलाईन भारतीय किराणामाल आणायचा का? ". लगेच किराणामालाची एक यादी बनवली. ऑनलाईन किराणा मागवल्याने आमचा फायदा झाला. एक म्हणजे सामान घरपोच आले आणि दुसरे म्हणजे ज्या खोक्यातून सामान आले ती खूप उपयुक्त ठरली. उरलेला मधला कप्पा जो रिकामा होता त्यात सर्व कसे बसवायचे याचा विचार सुरू झाला. स्टुडिओ अपार्टमेंटमधला हा नवीन अनुभव खूप छान वाटत होता. असे वाटत होते की आपण जितकी जागा वापरू तितकी ती आपल्याला कमीच पडते!किराणामालाच्या खोक्यांमध्ये प्लॅस्टिकच्या बॅगेत पूर्ण सामान आले. त्यातले रोजच्या रोज वापरात काय काय सामान लागते याची एक यादी बनवली व परत दुकानामध्ये डबे बरण्या खरेदीसाठी गेले. प्लॅस्टिकच्या बरण्या पारदर्शक व दिसायलाही छान दिसतात त्याच खरेदी केल्या. खोलगट, उभट, चौकोनी असे वेगवेगळे बरण्यांचे आकार घेतले व त्यात सामान भरले. तांदूळ, डाळ, पोहे, रवा, साबुदाणा, दाणे एकेकात भरले व ओळीने त्या कप्यात लावले. वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांकरता उभट आकाराच्या बरण्या छान व सुबक दिसत होत्या. खोक्यांमधली जी प्लॅस्टिकची बॅग उघडायचे ती उभी करून ठेवायचे म्हणजे त्यातले काही सांडायचे नाही. रबर बॅंडने पिशव्याही बंद करून घ्यायचे. सर्वात वरचा कप्पा होता त्यात मिक्सर, बल्ब, इस्त्री असे ठेवले.


आतापर्यंत सर्व सामानाची व्यवस्था लावली ती मनाजोगती लावली गेली होती. सर्व काही जिथल्या तिथे वेळच्या वेळी ठेवायला लागत होते. भांडी रोजच्या रोज दोन वेळेला घासायलाच लागायची. भांडी विसळून उपडी करून लगेचच्या लगेच जागेवरही ठेवायला लागायची. सकाळची पोळी भाजी झाली की मी घराबाहेर येऊन बसायचे. हे घर जंगलात होते. सर्व बाजूने हिरवीगार झाडीच झाडी होती. या झाडांचे बरेच ओंडके घराच्या बाहेरच्या बाजूला होते. त्यातल्या एका ओंडक्यावर सकाळच्या गार हवेत बसले की छान वाटायचे. समोरचा रस्ता दिसायचा. विद्यापीठात जाणारे विद्यार्थी, काही चालत तर काही बसला उभे राहिलेले दिसायचे. हिरव्यागार झाडीतून जांभळ्या व नारिंगी रंगांची रंगसंगती असलेली बस दिसायची. असा सर्व निसर्गरम्य देखावा पाहताना असे वाटायचे की या ओंडक्यावरून उठूच नये. या घराच्या भोवती जी उंच उंच झाडे होती त्यामुळे कायम सावली असायची. पानगळीमध्ये पूर्ण अपार्टमेंटच्या सभोवताली रंगीबेरंगी वाळक्या पानांचा मोठा ढिगारा साठायचा. त्यावरून कोणी चालत आले की सळसळ असा आवाज यायचा. हिवाळ्यामध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हात ओंडक्यावर बसले की कोवळ्या उन्हाची तिरीप पर्णहीन झाडांतून यायची.


आमच्या शेजारी एक अमेरिकी विद्यार्थी राहायचा. फावल्या वेळात तो बस (Clemson Area Transit ) चालवायचा. आमचे बसने नेहमी येणे जाणे असल्याने ओळखीचा झाला होता. घरी असला की तो ओसरीवर एक खुर्ची टाकून बसलेला असायचा. एकदा मी त्याच्या घरी सहज म्हणून भजी द्यायला गेले आणि सांगितले ही खाऊन बघ तुला कदाचित आवडतील. त्याच्या घरात मी प्रथमच जात होते. तो क्वचितच घरी असायचा. त्याच्या घरी गेले आणि बघतच राहिले. तो एकटा राहत होता तरी त्याच्या घरी सर्व सामान होते आणि तेही एकाच खोलीत. त्याच्याकडे सोफा होता, शिवाय टेबल, खुर्ची, पलंग, डायनिंग टेबल व त्याच्या चार खुर्च्या होत्या. मोठा टीव्ही व त्याखाली एक छोटे कपाटही होते. सर्व सामान असूनही टापटीप ठेवलेली ही खोली मला खूपच आवडली. आतापर्यंत आमच्याकडे असलेले थोडे सामान एका खोलीत कसे काय बसवायचे या चिंतेत मी होते आणि इथे तर सर्व सामान होते. आता मला आमच्या खोलीत सर्व काही असावे असे वाटू लागले. आमच्याकडे असलेल्या आरामदायी खुर्चीत बसून मी विचार करायला लागले. सोफा, टेबलखुर्च्या, जेवणाचे टेबल, पलंग, कुठे बसेल व कसे बसेल, विकत आणावे की नकोच अशी विचारचक्रे सुरू झाली. बसल्या बसल्या सर्व फर्निचर असलेले कल्पनाचित्र रंगवू लागले. परत वाटायचे नकोच काही, आहे ते सर्व काही व्यवस्थित आणि छान लागले आहे. एकाच खोलीत राहायचे आणि ते सुद्धा दोन वर्षाकरताच म्हणून आम्हाला जास्तीचे सामान घ्यायला नको असे वाटत होते. खूपच गिचमीड होईल म्हणून साधा डेस्कटॉपही (computer) घेण्याच्या विचारात नव्हतो. सजीव माणसांचेच नाही तर निर्जीव वस्तूचेही ऋणानुबंध असतात बर का!! काही दिवसांनी आमच्या शेजारी राहणारा तो अमेरिकी राहते घर सोडून निघून चालला होता. त्याने आम्हाला सांगितले की तुम्हाला जे सामान हवे आहे ते घेऊन जा. त्यातले माझे जे काही आहे ते मी थोडेफार घेऊन जाणार आहे. बाकीचे सामान मित्रांनी दिले होते आणि तेही आता इथे राहत नाहीत. माझ्यात परत उत्साह संचारला व थोडाफार तरी बदल आपण आपल्या जागेत करूच म्हणून त्याच्याकडचे टेबल, व चार फोल्डिंगच्या खुर्च्या असलेले फोल्डिंग डायनिंग टेबल आणले. त्याच्याकडचे सामान आमच्याकडे हालविल्याने त्याचा भारही कमी झाला.


त्या अमेरिकन विद्यार्थ्याकडून सामान आणल्यावर परत सामानाची पुनर्रचना केली. ओट्याच्या बाजूला जेवणाचे टेबल ठेवले व गादीच्या दुसऱ्या बाजूला खिडकीशेजारी लाकडी टेबल ठेवले. टेबल आल्याने संगणक (computer) खरेदी करायचा ठरवला व खरेदी केला. पहिलावहिला डेस्कटॉप घरी आला. तारांची जुळवाजुळव झाली व संगणक सुरू झाला. चार फोल्डिंग खुर्च्यांपैकी दोन खुर्च्या भिंतीमधला जो रिकामा कप्पा होता त्यात अगदी सहजपणे मावून गेल्या. दोन खुर्च्यांपैकी एक ह्या टेबलासमोर ठेवली व एक जेवणाच्या टेबलाशेजारी ठेवली. जेवणाच्या टेबलावर आमचा पहिलावहिला खरेदी केलेला रेडिओ कम टेपरेकॉर्डर पण दिमाखात बसला. संगणकावर म्युझिक इंडियावर हवी तितकी आणि हवी तशी गाणी ऐकणे सुरू झाले. झालेला स्वयंपाक डायनिंग टेबलावर झाकून ठेवून तिथेच ताट वाढून खुर्चीवर बसून जेवायला मजा यायला लागली. या चार फोल्डिंग खुर्च्या व दुसरी आरामदायी खुर्ची असल्याने मित्रमंडळींना गप्पा मारण्यासाठी बोलावू लागलो. अनेक जेवणावळी होऊ लागल्या. याच घरात होळीच्या दिवशी केलेला पुरणपोळीचा बेत गाजला. त्या दिवशी आम्ही दहा जण जेवायला बसलो होतो. या घरात दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा सुधीर जोशी सोबत आम्ही दोघांनी साजरी केली. भारतीय दुकान खूपच लांब होते त्यामुळे टिपिकल भारतीय भाज्या नशिबी नव्हत्या. जवळच एक थायी दुकान होते. तिथे काही वेळेला भारतीय वाणसामान आणि भाज्या मिळायच्या. एकदा तिथे छोटी कारली दिसली. जितकी होती ती सर्व घेतली आणि दसऱ्याला शेवया खीरसोबत भरली कारली केली होती.


२ वर्षाच्या कालावधीमध्ये या घरात बरेच काही घडले. मित्रमंडळ जमा झाले. श्रीलंकेतील रेणूका, उत्तर भारतातील राजेश-प्राची, मनिश-संगिता,ओडिसात ले कृष्णकुमार-उमा, पुण्यात रहाणारे येमुल -सुनिता, आणि सुधीर जोशी, पाकिस्तानातले इक्बाल-फरहाना. आम्ही सर्वजण एकमेकांकडे जाऊन गप्पा मारायचो, गाण्याच्या भेंड्या खेळायचो. मी ३ नोकऱ्या केल्या. पहिली नोकरी चर्चमध्ये दर रविवारी सकाळी व बुधवारी संध्याकाळची होती. नंतर डे - केअर मध्ये रोज १० ते ४, इंग्रजी क्लास मध्ये ज्या इतर देशातल्या बायका इंग्रजी शिकायला यायच्या त्या मुलांना सोबत घेऊन यायच्या. त्यांच्या मुलांना मी व रेणुका २ तासांकरता सांभाळायचो. मला फक्त एकच शनिवार इतर जास्तीची कामे करायला मिळायचा. डेंटन- टेक्सास मध्ये मी व माधवीने मिळून आमच्या J 2 Dependent visa वर वर्क पर्मिट काढले होते ते क्लेम्सन मध्ये रिन्यु केले. त्यामुळे मला नोकऱ्या करता आल्या. जाण्या येण्यासाठी बस होतीच. बस नसली तरी सर्व चालण्याच्या अंतरात होते. क्लेम्सन एरिया ट्रान्झिट ची बस दर १५ मिनिटाला आणि फूकट होती. नोकरी लागण्या आधी मी या बसने भरपूर हिंडत होते. शनिवार - रविवार मात्र ही बस दिवसा धावायची नाही तर रात्री २ वेळाच होती. आमचा ४-५ जणांचा ग्रुप (नवरा बायको) मिळून या बसने वाणसामान आणायला जायचा. बसमध्ये अंधुक प्रकाश आणि इंग्लिश ट्युन असायची. या बसमध्ये काही विदार्थी पण असायचे. क्लेम्सन हे अतिशय रम्य आणि उंचसखल भागात पठारावर वसलेले आहे. याच घरात आमची पहिलीवहिली कार आली. कारने वाणसामान व भाजी आणायला जायला लागलो. सोबत आमच्या घराच्या वर रहाणाऱ्या २ विद्यार्थिनींना न्यायचो. आमच्या या घराच्या जवळच क्लेम्सनचे रेल्वे स्टेशन होते. आगगाडी गेली त्याचा आवाज घरात ऐकू यायचा. बाहेर पडून फुटपाथ वरून चालायला लागलो तर एखादवेळेस रेल्वे जाताना दिसायची. रस्त्याच्या वर एक पूल होता तिथून ही जायची.


२००५ साली विनायकच्या नोकरी निमित्ताने क्लेम्सन सोडले आणि आम्ही नॉर्थ कॅरोलायना राज्यातल्या विल्मिंग्टन शहरात आलो. स्थलांतराचा अनुभव होताच. सर्व सामान खोक्यात भरून चिकटपट्या चिकटवून कार मध्ये खोकी ठेवली व ती पोस्टात पोहोचवली. हे स्थलांतर ६ तासांच्या कारने जाण्याच्या टप्यात होते. घर सोडण्याच्या आधी सर्व मित्रमंडळींनी आम्हाला जेवायला बोलावले. आम्ही सर्वांना पिझ्झा हट मध्ये घेऊन गेलो. तिथे मनसोक्त गप्पा मारल्या. काहींनी शुभेच्छा पत्रे व काहींनी भेटवस्तू दिल्या. एके दिवशी सर्व निरानिपटी आवरून रिकाम्या झालेल्या खोलीत बसलो तर मला एकदम रडूच आले. वर रहाणाऱ्या एका मैत्रिणीने आमच्या तिघांसाठी कॉफी केली. तिच्याही डोळ्यात पाणी आले. तिच्या मदतीने आम्ही आमचा डेस्क टॉप , छोटा टिव्ही व काही सामानाच्या बॅगा आमच्या कारमध्ये ठेवल्या आणि विनु कार सुरु करणार इतक्यात मी म्हणाले थांब. कारमधून उतरले. बाहेरूनच खिडकी मधून आमच्या घरात डोकावले व शेवटचे डोळा भरून घराला पाहून घेतले. नव्या शहराच्या वाटेवर या घरात घडलेल्या गोष्टींची सारखी आठवण येत राहिली. निघताना प्रचंड थंडी होती. तापमान मायनस सेल्सिअस मध्ये होते. पोळी भाजी वाटेत खाण्याकरता करून घेतली होती. अर्धे अंतर कापून गेल्यावर एका विश्रांती थांब्यावर थांबलो होतो. तिथेच असलेल्या बाकड्यावर बसून जेवणार होतो पण थंडी आणि बोचरे वारे प्रचंड होते त्यामुळे कारमध्ये बसूनच जेवलो. पाणी पाण्याच्या बाटल्या बरोबर होत्या त्यामुळे अडचण आली नाही. विल्मिंग्टन मधले आमचे घर समुद्रकिनाऱ्यापासून जवळ होते. पुढील लेखात विल्मिंग्टन मधल्या सुंदर घराच्या सुंदर आठवणी घेऊन येतेच ! तोपर्यंत वाचत रहा. Copy Right - Rohini Gore


क्रमश : ...

Thursday, April 11, 2024

सुंदर माझं घर ..... (५)

२२ मे २००१ रोजी संध्याकाळच्या सुमारास आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. या अपार्टमेंटच्या शेजाररच्या अपार्टमेंटमध्ये एक तामिळ भारतीय कुटुंब राहत होते. त्यांच्या घरात म्हणजे अपार्टमेंट नंबर 6 मध्ये आम्ही 8 दिवसा नंतर जाणार होतो, कारण ते जागा सोडून दुसऱ्या शहरात जाणार होते. त्यांच्या जागेचे lease agreement आम्ही take over करणार होतो त्यामुळे त्यांचे त्या जागेचे डिपॉझिट त्यांना मिळणार होते. २०५ नंबर मध्ये आम्ही फक्त ८ दिवस रहाणार होतो. त्या जागेत रहाणारी सत्या मला म्हणाली आज रात्री तुम्ही आमच्याकडेच जेवा, दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या घरात तुमचे नवीन रुटीन सुरू करा. त्यादिवशी रात्री आयते जेवण मिळाले ते एका दृष्टीने बरेच झाले. नवीन घरात रात्री काही करायला उत्साह नसतोच. त्या कुटुंबात एक शाळेत जाणारी मुलगी होती. त्यांच्याकडे जेवायला गेलो तर सत्याची मुलगी माझ्या मांडीवरच येऊन बसली. मला खूप छान वाटले. तिने जेवणही छान बनवले होते. पोळी भाजी बरोबर तिने डोसाही बनवला होता. तसे अमेरिकेत आल्यावर ८ दिवस आम्ही प्रोफेसरांच्या बंगल्याच्या शेजारच्या छोट्या बंगल्यात राहत होतो पण तिथे भारतीय जेवण नव्हते. त्यामुळे या मैत्रिणीच्या घरी घरचे छान जेवण जेवल्यावर बरे वाटले. जेवण करून घरी आलो. पिवळ्या बल्बमधले मिणमिणते दिवे नकोसे वाटत होते. झोपायचे होते पण गादी नव्हती. या घरात रहायला येण्या आधी प्रोफेसर ऍलन मर्चंड यांनी आम्हाला सॅम्स क्लबमध्ये नेले होते. सॅम्स क्लब हे अमेरिकेतले अवाढव्य दुकान आहे. इथे घाऊक माल विकत घ्यावा लागतो व वर्षाचे पैसे एकदम भरून त्या दुकानाचे सदस्यत्व घ्यावे लागते. इथे आम्ही काही गरजेच्या वस्तू खरेदी केल्या. त्यात 25 किलो तांदुळाचे पोते व 10 किलो मैदा घेतला. हवा भरून तयार करता येईल अशी एक गादी घेतली. खरे तर मला इतका मैदा घ्यायचा नव्हता पण कणिक कधी कोठे मिळते हे माहीत नसल्याने मैद्याच्या पोळ्या करून खाता येतील म्हणून घेतला. त्या गादीत हवा भरून ती फुगवली व त्यावर भारतातून आणलेल्या दोन चादरी घालून झोपलो. उशाला काही नव्हते. झोप येता येत नव्हती. आपण इथे फक्त दोघेच्या दोघेच आहोत याचा एकाकीपणा खूप जाणवत होता. त्या घरात त्यादिवशी आम्ही दोघे आणि आमच्याबरोबर आणलेल्या भारतातल्या ४ बॅगाच होत्या. भारताची प्रखरतेने आठवण येत होती.



२०६ अपार्टमेंट मध्ये आम्ही जाणार होतो कारण या घरापासून विद्यापीठ, वाण सामानाचे दुकान, धुणे धुवायचे दुकान हे सर्व चालत जाण्याच्या अंतरावर होते. शिवाय या घरात जरूरीपुरते सर्व लाकडी सामान होते. अर्थात ते त्यांचे नव्हते. या आधी रहाणाऱ्या माणसांनी ते असेच सोडून दिले होते. झोपायला बेड होता. बसायला फिरती खुर्ची आणि टी पॉय होता. लाकडी सामान जुने असले तरी ते होते हे महत्वाचे. सत्याने मला तिच्याकडच्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बरण्या व प्लॅस्टीकचे डबे साफ करून दिले. म्हणाली तुला वाण सामान ठेवायला उपयोगी पडतील. Sack & Save अमेरिकन दुकानात रोजच्या वापरातल्या सर्व जरूरीच्या वस्तू म्हणजे टुथब्रश, टुथपेस्ट,अंगाला लावायचा साबण, टिश्यु पेपर, पेपर टॉवेल, साखर, तेल, भाज्या, इत्यादी आणून दिवसाची सुरवात झाली. आठ दिवसानंतर २०६ मधले तमिळ कुटुंब दुसऱ्या शहरी गेले आणि आम्ही २०६ मध्ये शिफ्ट झालो. त्यांना टाटा केला. सत्याने मला जाता जाता फोडणीचे साहित्य पण दिले मोहरी,हिंग हळद. इलेक्ट्रीकच्या शेगड्या, अरूंद स्वयंपाकघर, मिणमिणते दिवे, अंघोळीकरता अरूंद टब सर्व काही नवीनच होते. अंघोळ करताना तर सुरवातीला छोटी बादली व त्यात एक ग्लास टाकून भारतात अंघोळ करतो तशी केली. शॉवरचे पाण्याने केस ओले न होता अंघोळ करायला एक दोन दिवसातच जमवले. फक्त मला इथले एक आवडले ते म्हणजे गरम व गार पाणी दोन्ही होते. त्यामुळे मनसोक्त अंघोळ करता येत होती. इलेक्ट्रीकच्या शेगडीवर चहाला लागणारा वेळ, कूकरला लागणारा वेळ हे काही पचनी पडत नव्हते. इथे घरपोच सेवा नाही. त्यामुळे मुंबईतल्या दिवसांची खूपच आठवण येत होती. घरपोच वाणसामान,घराच्या दाराशी टाकलेले वर्तमानपत्र, गोकुळ दुधाची पिशवी, दारात ठेवलेला केराचा डबा की जो केरवाली घेऊन जाते. धुणे-भांडी करायला येणारी बाई, तिच्याशी होणाऱ्या गप्पा. गप्पांसोबत तिने व मी खाल्लेला फोडणीचा भात व नंतर चहा. या सर्व गोष्टींची तीव्रतेने आठवण येत होती. संध्याकाळी मराठी बातम्या टीव्हीवर पाहण्याची खूप सवय होती तेही खूप जाणवत होते.


अपार्टमेंट मध्ये मोठा फ्रीज, ४ इलेक्ट्रिक शेगड्या, त्याखाली ओवन, मायक्रोवेव्ह, डिशवॉशर, centralized heating/cooling ओट्याच्या वर व खाली डबे ठेवायला कपाटे होती. इथल्या प्रत्येक अपार्टमेंट मध्ये या सर्व गोष्टी असतात. इथे घराच्या बाजूलाच रस्ते क्रॉस केल्यावर धुणे धुवायचे दुकान होते. त्यामुळे सर्व धुणे घेऊन तिथे जायला लागायचे. ८ दिवसाचे कपडे साठवून ते मशीन मधून धू ऊन आणायचे हे मला अजिबात आवडले नव्हते. मुंब ईत रहात दर २/३ दिवसांनी मी वॉशिंग मशीन मधून कपडे धूत होते. विनायक ८ वाजता लॅब मध्ये जायचा. त्यानंतर मी एकटीच घरी असायचे. माझे मी आवरून स्वैपाक करायचे. दुपारी १ ला विनु घरी जेवायला यायचा. नंतरचा वेळ मी बाहेर गॅलरीत उभे राहून परत घरात यायचे. घरात आले आणि एखाद्या कार येण्याचा आवाज आला की लगेच परत बाहेर यायचे. असे वाटायचे की आपल्याकडेच कुणीतरी आले आहे. गॅलरीत उभे राहून बाहेर पाहिले की इथे कोणीही राहत नाही असे वाटायचे कारण की सर्वांची दारे बंद. रस्त्यावर कोणी दिसायचे नाही. सगळे रस्ते सुनसान. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे रहायला आलो होतो त्यामुळे कुठेही कसलीही रहदारी किंवा माणसे दिसत नव्हती. बरेच विद्यार्थी भारत दौऱ्यावर गेले होते आणि अमेरिकन्स त्यांच्या घरी गेले होते. भारतातल्या सवयीप्रमाणे कॅन मधले दूध मी पातेल्यात ओतून गरम केले, सायीचा पत्ताच नव्हता, साय नाही तर सायीचे ताक लोणी तूप कसे करायचे असे मोठाले प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. एकदा अशीच गॅलरीत उभी होते तर मला एक भारतीय माणूस खालच्या घरातून बाहेर येताना दिसला. त्याची बायको प्रविणा बाहेर आली आणि मला गॅलरीत पाहून ती वर आली आणि माझी विचारपूस केली. ती म्हणाली की तू नवीन आहेस तर तुला जे हवे ते माग माझ्याकडे मी खालीच रहाते. ती तेलुगू होती. संभाषण इंग्रजी मधूनच केले. प्रविणाने मला दही बनवण्यासाठी विरजण दिले, ती म्हणाली मी घरीच दही बनवते, आम्हाला खूप लागते दही. भारतावरून मी ताक घुसळायला रवी आणली होती. त्यानंतर २-४ दिवसात प्रविणा व श्रीनिवास यांनी आम्हाला त्यांच्या कारमधून भारतीय दुकानात नेले. ते खूप दुरवर होते. भारतीय सामान म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी, पिठे, पोहे, रवा, साबुदाणा, घेतले. शिवाय भारतीय भाज्याही घेतल्या. (तोंडली, गवार, छोटी वांगी, भेंडी) भाजी चिरायला अंजलीचा चॉपर आमच्या बरोबरच आणला होता. आमचे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स सी आकाराचे होते आणि त्याला लागूनच वाहता रस्ता होता. रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही दोघे एक भली मोठी चक्कर मारायला जायचो. Texas मध्ये प्रचंड उन्हाळा असतो. रात्री दहाला पण गरम हवेच्या हाळा लागायच्या. बाहेरून घरात आलो की घरात कुलर असल्याने थंडगार वाटायचे. काही दिवसांनी आम्हाला रस्त्यावरून चालत असताना माधवी रवी ची जोडी दिसली. आम्ही एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. एकमेकांचे फोन नंबर घेतले. माधवी खूपच बोलकी होती. ती हिंदीतून बोलायची. नंतर कविता-पवनकुमार आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये रहायला आले. प्रविणा-कविता आणि मी एकमेकींना वाडग्यातून घरी काही चमचमीत केले असेल तर द्यायचो. अशी देवाणघेवाण छान वाटत होती. बऱ्याच वेळा मी व प्रविणा जिन्यात बसून चहा प्यायचो. या अपार्टमेंटला बाहेरून जिने होते. जेव्हा हिमवृष्टी झाली ती मी पहिल्यांदाच आयुष्यात अनुभवली. गॅलरीत जमा झालेल्या बर्फात मी स्वस्तिक व फूल कोरले आणि त्यावर हळदीकुंकू वाहिले. कविता, प्रविणा, माधवी ही तीन तेलुगु कुटुंबे आणि आम्ही दोघे मराठी असा आमचा छान ग्रुप तयार झाला. नंतर काही दिवसांनी मला कळाले की डॅलस वरून रेडिओवर २४ तास हिंदी गाणी प्रसारित होतात. त्यामुळे आम्ही वाल मार्ट मधून रेडिओ कम टेपरेकॉर्डर विकत आणला. रेडिओ वर जुनी नवी हिंदी गाणी लागत होती आणि मधून एक बाई निवेदन करायची. त्यामुळे थोडेसे का होईना बरे वाटत होते. विनायकच्या लॅब मध्ये एक चिनी काम करत होता. तो विनायकला म्हणाला की तू लगेच टिव्ही घे. नाहीतर तुझी बायको घरी बसून वेडी होईल. त्याकरता तो आम्हाला त्याच्या कारमधून वॉल मार्ट्ला घेऊन आला आणि आम्ही १३ इंची टिल्लू टिव्ही विकत घेतला. या टीव्ही वरूनच ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर इराकी हल्ला झाल्याचे कळाले होते. दिवसभर हीच बातमी प्रसारित होत होती.


सौमित्र गोडबोले नावाचा एक विद्यार्थी ओळखीचा झाला. त्याचे वडील मराठी आणि आई बंगाली होती. त्याला मराठीत बोलता यायचे नाही. हिंदीतून बोलायचा. तो खूप खावस होता. त्याला मी अधुन मधून जेवायला बोलवायचे. तो ग्रीक योगर्टचे श्रीखंड बनवून आणायचा. मी बाकीचा सर्व मराठमोळा स्वौपाक करायचे. नंतर आम्ही व्हीसीआर लावून हिंदी सिनेमे बघायचो. मी आणि माधवीने मिळून बऱ्याच गोष्टी केल्या. मी आई बाबा, सासूसासरे, माझी बहीण यांना पत्र पाठवते हे माधवीला सांगितल्यावर ती पण तिच्या घरी पत्रे पाठवू लागली. ती तिच्या घरातून व मी माझ्या घरातून विद्यापिठातल्या पोस्ट ऑफीस मध्ये यायचो. इथल्या ग्रंथालयात अनेक डेस्क टॉप होते. त्यावरून मी ईसकाळ वाचायचे. रोज दुपारी मी ग्रंथालयात जायचे व तिथून विनुच्या लॅब मध्ये जाऊन आम्ही दोघे घरी परतायचो.
माधवी माझ्या घरी व मी तिच्या घरी चालत जायचो. एकमेकींकडे जाऊन चहा पाणी व्हायचे. सोबत बटाटा वेफर्स असायचे. आम्ही ४ कुटुंबाने ३१ डिसेंबर २००१ साजरा केला. त्यात मी सर्वांना ७०-८० बटाटेवडे केले होते. प्रत्येकीने एकेक पदार्थ वाटून घेतला होता. सर्व जणी खूपच दमलो होतो. त्यामुळे जास्त जेवण गेले नाही. उरलेले सर्व जेवण आम्ही वाटून घेतले आणि १ जानेवारी २००२ ला गरम करून खाल्ले. दोन्ही दिवशी खूप बर्फ पडत होता. आम्ही सर्वांनी मिळून गाण्याच्या भेंड्या खेळल्या. त्यात तेलगू, मराठी हिंदी अशी सर्व गाणी होती. आम्ही आलो ते १ वर्षाचा ( J 1 ) विसा घेऊन. नंतर विनुने दुसरीकडे post doctorate करण्यासाठी विद्यापिठात अर्ज करायला सुरवात केली. त्याला ४ विद्यापिठातून बोलावणे आले होते. त्यापैकी त्याने क्लेम्सन शहर निवडले. क्लेम्सन हे साऊथ कॅरोलायना राज्यात आहे. आमच्या सर्व बायकांचा Dependent visa (J2) होता. मी व माधवीने १०० डॉलर्स भरून वर्क पर्मिट काढले. अर्थात ते मला क्लेम्सन शहरात गेल्यावर उपयोगी पडले. या घरात आम्हाला अमेरिकेतले स्थलांतर कसे करायचे हे शिकायला मिळाले आणि ते नंतर उपयोगी पडले.


डेंटनवरून क्लेम्सनला विमानानेच जावे लागणार होते इतके ते लांब होते. प्रविणा व तिचा नवरा श्रीनिवास यांनी आम्हाला कशा प्रकारे स्थलांतर करायचे हे सांगितले. श्रीनिवास म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला पॅकिंग कसे करायचे ते सांगतो. तुम्ही फक्त एक करा मला ५ ते ६ खोकी आणून द्या. त्यादिवशी संध्याकाळी ते दोघे आमच्या घरी आले. गप्पा मारत होते. अधुनमधून मी चहा करत होते. केव्हा जाणार, कोणत्या विमानाने जाणार, असे विचारले आणि त्यांनी हे पण सांगितले की तुम्हाला तुमचे रहाते घर खूप स्वच्छ करून द्यावे लागेल तरच तुम्हाला तुमच्या जागेकरता भरलेले डिपॉझिटचे पैसे परत मिळतील. आम्ही खोकी आणली आणि एकेक करत आमचे सामान पॅक होऊ लागले. खोकी भरायला श्रीनिवासने आम्हाला मदत केली. सर्व पुस्तके आणि काही सामान पॅक केले. आमचा पहिलावहिला खरेदी केलेला टिल्लू टिव्ही खोक्यात गेला. टेप रेकॉर्डर कम रेडिओ पण एका खोक्यात गेला. टोस्टर आणि इतर बरेच सटर फटर सामान खोक्यात जात होते. ही सर्व खोकी आम्ही पोस्टाने (USPS) पाठवणार होतो. खोक्यांना चिकटपट्या चिकटवल्या. त्यावर पत्ताही लिहीला. हा पत्ता आम्ही पवनकुमारच्या मित्राचा दिला. ईमेलने त्याला विचारले आम्ही आमचे काही सामान पोस्टाने तुझ्या पत्यावर पाठवत आहोत, चालेल ना? की जो क्लेम्सन मध्ये रहात होता. क्लेम्सन मध्ये आम्हाला घर मिळाले नव्हते. तिथे गेल्यावर आम्ही पाहणार होतो.


भारतावरून आणलेल्या आमच्या चार बॅगा परत एकदा नव्याने पद्धतशीरपणे लावल्या. एका वर्षात आमचे सामान थोडे वाढले होते. श्रीनिवासने असे सुचवले की त्या शहरात तुम्ही नवीन आहात तर माझा असा सल्ला आहे की तुम्ही थोडेफार भारतीय किराणामालाची पण खोकी तयार करा. त्याकरता तो आम्हाला त्याच्या कारने भारतीय किराणामालाच्या दुकानात घेऊन गेला. काही मसाले, डाळी आणि थोडी कणिक असे परत पॅकीग झाले. इथल्या आणि भारतातल्या स्थलांतरामध्ये बराच फरक आहे. प्रत्येक स्थलांतराच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. जसे की अंतर जर लांब असेल तर विनानाने जावे लागते. काहीजण २० तासाचा प्रवास कारनेच करतात. काही जण U-Haul ट्रक कारच्या मागे जोडून प्रवास करतात. या ट्रकमध्ये सर्व सामान बसवता येते. हा ट्रक भाड्याने मिळतो. खूप फर्निचर असेल की जे आपल्याला उचलणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे अशामध्ये मुव्हर्स आणि पॅकर्स बोलावतात.


आम्ही जे स्थलांतर करणार होतो ते विमानने जाऊन करणार होतो आणि बाकी सर्व गोष्टी पोस्टाने पोहोचवल्या जाणार होत्या. सर्वात मुख्य म्हणजे इथल्या स्थलांतरामध्ये आपल्यालाच सर्व काही करावे लागते. राहते घरही स्वच्छ करून द्यावे लागते. कामांची नुसती रीघ लागलेली असते. भारतातून येताना ज्या बॅगा आणलेल्या असतात त्याही परत नव्याने लावायच्या म्हणजे डोकेदुखी असते. थोडेफार कपडेही वाढलेले असतात. थंडी असल्याने कोट, टोप्या, चपला बुटे हे पण वाढलेले असते. उन्हाळ्याच्या कपड्यांची पण थोडी भर पडलेली असते. शिवाय जे सामान पोस्टाने अथवा फेडेक्सने पाठवायचे असेल त्या खोक्यांची पण रांग लागलेली असते. त्यावर चिकटपट्या चिकटवून टाईप केलेले पत्ते यांच्या प्रिंटस चिकटवणे व सर्व खोकी एकेक करत उचलून, घर वरच्या मजल्यावर असेल तर खाली आणून परत ती कोणाच्या मदतीने ज्याच्याकडे कार असेल त्याच्या सोयीनुसार त्यात टाकून ती पोस्टात नेण्यासाठी न्यावी लागतात. अशा एक ना अनेक भानगडी असतात.


आम्ही दोघांनी सर्व खोकी भरून तयार केली. एकेक करत वरच्या मजल्यावरून एकेक खोकी उचलून विनायकने श्रीनिवासच्या कार मध्ये ठेवली व ते दोघे पोस्टात गेले. इलेक्ट्रीसिटी कंपनीला फोन करून ती अमूक दिवशी तोडून टाका. आता आम्ही इथे राहत नाही हे कळवावे लागते. टेलिफोन कंपनीलाही तसे कळवावे लागते. हे कळवले नाही तर आपल्या नावाची बिले त्या पत्यावर येत राहतात आणि फुकटचा भुर्दंड बसतो. निघण्याच्या आधी चार पाच दिवस तर हे करू की ते करू असे नुसते होऊन जाते. सामानाच्या आवरा आवरीत बराच कचरा साठलेला असतो तो टाकायला बऱ्याच चकरा होतात. शिवाय सामान जास्तीचे आणून चालत नाही. याउलट एकेक करून घरातले सामानच संपवण्याच्या मार्गावर न्यायचे असते. पूर्ण फ्रीज रिकामा करून जरुरीपुरत्याच भाज्या आणायला लागतात. फ्रीज रिकामा करून तो साफ करायला लागतो. बाथरूम, कमोड, सिंक हे साफ करायला लागते. व्हॅक्युमिंग तर अनेक वेळा करावे लागते. पासपोर्ट, जरूरीचे कागदपत्र आठवणीने एका बॅगेत भरावी लागतात. सगळीकडे पसाराच पसारा असतो. कपडे पण कपडे धुण्याच्या दुकानातून बरेच वेळा बरेच वेळा धुवून आणायला लागतात. कारण की आता लॉंड्री बॅगेत कपडे धुण्यासाठी साठवायचे नसतात. एक दिवस आधिचे कपडे तर तसेच पारोसे घ्यावे लागतात नाहीतर हातानेच धुवून, पिळून ते हँगरवर लटकावून वाळवावे लागतात. आपली अवस्था हमालाच्याही वरताण होऊन जाते. कामे करता करता पिंजरारलेले केस, स्वच्छता करता करता अंगावरच्या कपड्याला पुसलेले हात, त्या अवतारातच मैत्रिणींचे येणार फोन कॉल्स, असे सतत चालूच राहाते. पोटात कावळे कोकलत असतात पण तरीही त्याकडे जास्त लक्ष न देता पटापट कामे हातावेगळी करावी लागतात. स्वयंपाकघर तर स्वच्छ करून खूपच दमायला होते. तिथली सगळी कपाटे आवरून, त्यातले काही जे अगदी थोडे थोडे उरले असेल तर याचे काय करायचे? रागाने ते ही कचऱ्यात फेकून दिले जाते. इलेक्ट्रीक शेगड्या साफ करणे, कुठेही कोणताही कचरा, धूळ, घाण दिसत नाही ना हे बघावे लागते. हे सर्व करण्याचे कारण की आपण ज्या जागेकरता डिपॉझिट भरलेले असते ते जास्तीत जास्त परत मिळावे म्हणून. तरी सुद्धा थोडेफार पैसे कापूनच अपार्टमेंटवाले आपले पैसे आपल्याला परत करतात.


घराची होता होईल तितकी साफसफाई मी केली. विनायक लॅबमध्ये रात्रीपर्यंत काम करत होता. पॅकींग व साफसफाई करून जीव नुसता मेटाकुटीला आला होता. त्याहीपेक्षा सर्व मित्रमंडळींना सोडून जाणार याचे खूप दुःख होत होते. श्रीनिवास व रवी आम्हाला विमानतळावर त्यांच्या कारने सोडायला येणार होते. दोन बॅगा घेऊन मी श्रिनिवासच्या कारमध्ये बसणार होते तर विनायक दोन बॅगा घेऊन रवीच्या कारमध्ये बसणार होता. सकाळी उठून आवरले. त्या जागेतला शेवटचा चहा केला आणि उरलेले दूध प्रविणाला दिले. अजूनही काही नुकत्याच आणलेल्या भाज्याही दिल्या. प्रविणाने केलेली पोळी भाजी एका प्लस्टीकच्या डब्यात बांधून घेतली. पूर्ण सामानाची बांधाबांध झाली होती. एकेक करत सर्व बॅगा खाली उतरत होत्या. सर्वजण आम्हाला भेटायला खाली जमा झाले होते. मला आतून खूप गदगदत होते. घरातल्या प्रत्येक खोलीत जाऊन मी पूर्ण घराला डोळे भरून पाहत होते. प्रत्येक खोलीत जाऊन नमस्कार करून म्हणत होते "या घरातील आमचे वास्तव्य छान झाले. आता या घरात परत येणे नाही" काही राहिले तर नाही ना याची खात्री करून घेतली आणि कुलूप लावून मी खाली आले. सर्वांना आम्ही टाटा करत होतो. कारमध्ये बसताना घराला शेवटचे पाहून घेतले. टाटा करताना काही वेळाने सर्व दिसेनासे झाले आणि आमच्या मित्रांच्या दोन कारने हायवे वरून धावायला सुरवात केली. डॅलस विमानतळावर रवी व श्रीनिवासने आम्हाला सोडले. त्यांनाही टाटा करून काही वेळाने विमानात बसलो.


खरे तर आम्ही डॅलस-ग्रीनविल असे विमानाचे थेट बुकींग केले होते. मी व श्रीनिवास चुकीच्या गेटवर उभे राहिलो होतो त्यामुळे आमचे विमान चुकले. त्यावेळी कोणाकडेही मोबाईल फोन नव्हते. नाहीतर एकमेकांना फोन करून कळवता आले असते. तिथल्या बाईने आम्हाला दुसऱ्या मार्गाने आयत्यावेळी दुसऱ्या विमानाचे बुकींग करून दिले म्हणून बरे झाले. सव्यापसव्य करत आम्हाला क्लेम्सनला पोहोचायला रात्रीचे १२ वाजले. सकाळी ८ ला निघालेलो आम्ही थकून भागून उशिराने दुसऱ्या शहरी पोहोचलो होतो. Copy Right - Rohini Gore
क्रमश : ...

Sunday, April 07, 2024

सुंदर माझं घर ..... (४)

कंपनीच्या मागेच क्वार्टर्स होत्या. साधारण १२०० स्क्वेअर फुटाच्या. दोन बेडरूम, किचन, हॉल, servant's room हॉलला लागून मोठी बाल्कनी. डोंबिवलीतल्या एका माणसाच्या ओळखीने आमचे शिफ्टिंग झाले. त्याचा ट्रक होता. आमचे सामान जास्ती नव्हतेच. भांडीकुंडी एका पोत्यात भरली. एकात कपडे, आणि बाकीचे सुटे सुटे सामान एकेक करत ट्रक मध्ये भरले. हे सर्व करायला माणसे होतीच. त्या ट्रक मध्ये आम्ही तिघेही बसलो. आम्ही दोघे व सुषमा. अग्रेसर ४ मध्ये प्रवेश केल्या केल्या किती छान ! असेच उद्गार निघाले. सुषमा म्हणाली की जेवणात काहीतरी गोड करू. नेमका रवा सापडत नव्हता. त्यामुळे सुषमाने कणकेचा शिरा केला.


आम्ही तिघे जेवलो आणि दुपारचा चहा घेऊन ती डोंबिवलीस परतली. डोंबिवलीच्या घरात लाकडी सामान घेतले नव्हते ते या जागेत घेतले. सोफासेट, वेगवेगळे कप्पे असलेले मोठे कपाट घेतले. ते हॉल मध्ये ठेवले. टीपॉय, फोन ठेवायला कॉर्नरचे टेबल, मोठा बेड, दुसऱ्या बेडरूम मध्ये आमची डोंबिवलीची कॉट ठेवून जमिनीवरचे कार्पेट अंथरले. ओव्हल आकाराचे ६ जणांचे काचेचे डायनिंग टेबल असे सर्व काही घेतले. असे सर्व मनाजोगते फर्निचर १ लाखाचे होते. हे सर्व कंपनीकडूनच (white goods ) लेमन व गुलाबी रंगाची रंगसंगती असलेले पडदेही शिवले. विनु रोज दुपारी घरी जेवायला यायचा. डायनिंग टेबलवर वर बसून जेवायला छान वाटायचे. रात्रीचे जेवण आम्ही खाली बसून जेवायचो आणि एकीकडे आभाळमाया मालिका पहायचो. रोज रात्री जेवण झाल्यावर कंपनीच्या आवारात ३-४ फेऱ्या मारायचो. पॉटलक हा प्रकार मला इथे आल्यावरच कळाला. पहिल्या पॉटलकच्या वेळी मी ७०-८० पुऱ्या केल्या होत्या. दुसऱ्या वेळी ७०-८० बटाटेवडे केले होते. टिव्ही वर मी दुपारी महाश्वेता पहात होते. दर रविवारी सकाळी पार्ल्यात भाजी आणायला जायचे. हा बाजारहाट मला खूपच आनंद देवून जायचा.


Advanced Diploma of Computer Programming हा कोर्स मी डोंबिवलीत करत होते. त्या कोर्सचे शेवटचे उरलेले काही दिवस मी अंधेरी-डोंबिवली ये-जा करून पूर्ण केले. मी अंधेरी ते घाटकोपर बसने जायचे. नंतर घाटकोपर ते डोंबिवली ट्रेनने प्रवास करायचे. परत घरी जाताना डोंबिवली-घाटकोपर-अंधेरी. एक चांगले होते की ट्रेन मध्ये मला ऑफीसची गर्दी लागायची नाही. सकाळी दुधात कॉर्नफ्लेक्स घालून ते खाऊन निघायचे. बरोबर काहीतरी छोट्या डब्यात खायला घ्यायचे. कारण यायला मला दुपारचे २ वाजायचे. ९ ला निघायचे. जाताना बसला गर्दी असायची. प्रोजेक्ट करायला मात्र मी सुषमा नेर्लेकर कडे ४ दिवस राहिले होते. नंतर लेखी परिक्षेसाठी मी अंधेरीवरून दादरला आले होते. परिक्षा झाल्यावर घरी आले तेव्हा खूप हायसे वाटले. हा कोर्स पूर्ण झाला याचे समाधान वाटले. नंतर विचार केला होता की एक कंप्युटर घेऊन जे शिकलोय त्याचा सराव करायचा. मला सी लॅंगवेज मध्ये गोडी वाटु लागली होती. दीपाली मला म्हणाली होती की मी तुम्हाला कोणती पुस्तके घ्यायाची त्याची यादी देईन व तुम्ही सराव करा. काही अडले तर मी सांगेन तुम्हाला. नंतर मला एका मैत्रिणीकडून कळाले की घरबसल्या Data entry चे काम मिळते. घरबसल्या काम मिळाले तर ते चांगलेच होईल असा मनाशी विचार केला होता.


आणि एक दिवस दुपारी श्री नेर्लेकर यांचा आम्हाला फोन आला की आपले पारखी काका गेले. मी जोरात ओरडलेच काय ? विनु व्यायाम करत होता. आम्हाला दोघांनाही हा मोठा शॉक होता. २ जानेवारी २००० सकाळी पारखी काकांचे निधन झाले होते. पारखी काका काकू आमच्या शेजारीच रहात होते. विनुने व्यायाम पूर्ण केला आणि आम्ही डोंबिवलीला गेलो. डोंबिवलीवरून परत घरी अंधेरीला यायला रात्रीचे १२ वाजून गेले होते. सकाळी उठलो तर विनुचा डावा हात खूपच सुजला होता. चांगला टरटरून फुगला होता. लगेचच आम्ही डॉक्टरांकडे गेलो. एक्स-रे काढले तर त्यात असा रिपोर्ट आला की शिरेमध्ये रक्ताची बारीक गुठळी झाली आहे. विनुला Thrombosis झाला होता. लगेचच त्याला दवाखान्यात ऍडमिट केले. ८ दिवस मी एकटीनेच सर्व मॅनेज केले.


विनुला सलाईन मधून गुठळी विरघळण्याचे औषध दिले. ही रक्ताची गुठळी हळूहळूच विरघळायला हवी होती. माझ्याकडे शुभांगी नावाची कामवाली बाई होती. तिच्या मदतीने मी एकटीन सर्व केले. रात्रीचे जेवण करून मी विनुकरता डबा घेऊन दवाखान्यात जायचे. सकाळी दवाखान्यात चहा देत होते. चहा, नाश्ता फक्त पेशंटला होता. सकाळी दवाखान्यातून मी घरी रिक्शाने यायचे. शुभांगीला सांगून ठेवायचे की तू सकाळी माझ्याकडे कामाला आधी ये ८ वाजता. तशी ती बरोबर ८ ला हजर असायची. घरी आल्यावर मी ब्रश, चहा, अंघोळ करून पोळी भाजी भात आमटी करायचे. माझे आवरून होईतोवर शुभांगी झाडू-पोछा, धुणे-भांडी करायची. शिवाय कणिक भिजवून व भाजी चिरून ठेवायची. नंतर मी माझे जेवण करून व थोडी विश्रांती घेऊन ११-१२ च्या सुमारास परत डबा घेऊन दवाखान्यात जायचे. संध्याकाळी परत येऊन रात्रीचा डबा घेऊन दवाखान्यात झोपायला जायचे. तेव्हा विनुला भेटायला श्री नेर्लेकर आले होते. विनुला पथ्य नव्हते. हळूहळू करत ती रक्ताची गुठळी विरघळून गेली. विनुला बिपीचा त्रास ३०व्या वर्षापासूनच आहे. नंतर रक्त पातळ ठेवायच्या गोळ्या सुरू झाल्या.


लग्नानंतर दहा वर्षांनी का होईना सर्व काही छान झाले होते. प्रमोशन, नंतर कंपनीची मोठी जागा, फोन, मनाजोगते लाकडी सामान, कंपनीत जाण्यायेण्याचा त्रास नाही. दुपारचे गरम गरम जेवायला विनु घरी येत होता. हा आनंद अगदी थोडे दिवसच टिकला. कंपनीने विनुला तळोजा फॅक्टरीत जायला सांगितले. तो रोजच्या रोज तळोजाला कंपनीच्या कारमधून जायला लागला. विनुबरोबर मनिशही जात होता. कार चालवण्यासाठी कंपनीचा ड्राइव्हर होता. त्यातही त्याची रात्रपाळी सुरू झाली. कंपनीची कार असली तरी जाण्यायेण्यात २-३ तास मोडत होते. येताजाता ट्रॅफीकचा मुरांबाही होताच. एक दिवस रात्रपाळी संपवून विनायक आणि मनिश कारमधून घरी आले. कार तशीच ठेवली. मनिशलाही तू थांब असे सांगितले. ड्राईव्हरला पण थांबायला सांगितले. विनुच्या पोटात खूपच दुखत होते. घरी आल्यावर कॉटवर तो थोडा आडवा पडला. त्याला ताप भरत होता. त्यातच त्याला खूप मोठी उलटी झाली. उलटीमध्ये थोडे रक्तही गेलेले दिसले. ती उलटी मी लगेच साफ केली आणि मनिशला इंटरकॉमवर फोन केला. नंतर आम्ही दोघे व मनिश डॉक्टरांकडे कंपनीच्या कार मधूनच गेलो. त्यांनी तपासले. एक्सरे काढले. त्यात अपेंडिक्सचे ऑपरेशन लगेचच करायला सांगितले नाहीतर ते आतल्या आत बर्स्ट होण्याची शक्यता आहे.


हॉस्पिटलमध्ये लगेचच ऍडमिट केले. सर्व चाचण्या केल्या. ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत मनिश माझ्यासोबतच होता. मी मनातून घाबरले होते याचे कारण रक्त पातळ होण्याच्या गोळ्या विनु घेत आहे आणि त्यात ऑपरेशन ! मन अस्वस्थ होते. मनिश म्हणाला तू टेंशन घेऊ नकोस. डॉक्टर सर्व व्यवस्थित करतील. विनुने डॉक्टरांना सांगितले होते की तो रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत आहे. हे सांगून सुद्धा डॉक्टरांनी नीट काळजी घेतली नाही. ऑपरेशन यशस्वी झाले पण जखम बरी न होता त्यातून रक्त वहायला लागले. नंतर लगेचच मी सासरी माहेरी फोन करून कळवले. श्री नेर्लेकर, राहूल जोशीला पण फोन केला आणि सांगितले. डोंबिवली वरून राहूल, वैशाली, जोशीकाका आणि नेर्लेकर लगेचच धावत आले. सलाईन मधून रक्त द्यायला सुरवात केली होती. पण हे असे किती वेळ चालू रहाणार म्हणून मी श्री नेर्लेकर यांना सांगितले की तुम्ही प्लीज डॉक्टरांना विचारता का? की ब्लड का थांबत नाहीये. त्यावर काही उपाय नाहीये का? तसे लगेचच त्यांनी विचारले. तिथले डॉक्टर पण चिंतेत पडले होते. नेर्लेकरांनी मला येवून सांगितले की आता नानावटीला हालवायचे आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि मध्यरात्री तातडीने अंब्युलन्स मधून आम्ही सर्व नानावटी हॉस्पीटल मध्ये गेलो.


तिथे डॉक्टर दिक्षीत म्हणाले की पोटातून रक्त कुठून येत आहे ते पहायला हवे त्याकरता मला एक मोठी सर्जरी करावी लागेल. पोट फाडून बघायला हवे. डॉक्टरांनी सांगितले की सर्जरी कमीतकमी ४-५ तास चालेल. मी तुम्हाला आता काहीही सांगू शकत नाही. डॉक्टरांनी असे सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकली. रात्रभर ऑपरेशन चालू होते ते पहाटे संपले. ऑपरेशन यशस्वी झाले. नंतर विनुला शुद्ध आली आणि मला खूपच हायसे वाटले. विनुला सलाईन आणि ब्लडही देत होते. नाकातोंडात नळ्या होत्या. ते बघून मला खूप वाईट वाटत होते.


ऑपरेशन चालू असताना रात्रभर मी गजानन महाराजांचा जप करत होते. तरी सुद्धा अधुन मधून मला हुंदका येत होता. ती रात्र मी कशी काढली ते माझे मलाच माहीत. अर्थात माझ्याबरोबर मला धीर द्यायला डोंबिवलीकर होते. नंतर कंपनीतल्या सर्वांनी मला मदत केली. सकाळी सुषमा आणि पारखी वहिनी आल्या. मौमिताने मला जेवण पाठवले होते. सुषमा म्हणाली की तू आधी शांतपणे जेवून घे आणि थोडी आडवी हो. आम्ही आहोत सोबत. आडवी झाल्यावर मला थोडी डुलकी लागली आणि बरे वाटले. पहाटे आईबाबा- सासूसासरे आले. नंतर थोड्यावेळाने सुषमा, नेर्लेकर, राहूल वैशाली, जोशी काका डोंबिवलीला गेले. मला दोन्ही वेळेला मौमिता जेवणाचा डबा पाठवत होती. हॉस्पिटल मध्ये आधी मी रात्रीची झोपायला जायचे. पण तिथे कूलर असल्याने माझे डोके भणभणायला लागायचे म्हणून मग रात्री सासरे झोपायचे व दिवसा पूर्ण दिवस मी असायचे. शुभांगीला पोळ्याही करत जा असे सांगितले. शिवाय बाहेरून भाजी आणून ती चिरूनही दे. कणिकही भिजवून दे असे सांगितल्यावर ती म्हणाली तुम्ही काहीही काळजी करू नका. धुणे-भांडी-केर-पोछा या कामाशिवाय मी जास्तीचे काम तिला दिले होते. तिला तसे जास्तीचे पैसेही दिले.आई आमटी भात भाजी करायची. नंतर सुरेश-रंजना सई आले. हळूहळू विनायकच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली.


एकाशी एक बसून काय करणार ना? म्हणून मग आईबाबा-रंजन सुरेश पुण्याला गेले आणि सांगताना सांगून गेले की काहीही लागले तरी लगेच फोन कर. नंतर काशी आत्या आल्या. नंतर हळुहळू विनुची तब्येत सुधारत गेली. होळीच्या दिवशी विनू पुर्ण बरा होऊन घरी आला. त्याचे वजनही बरेच कमी झालेले होते. नंतर लगेचच सासूसासरे व काशी आत्या त्यांच्या घरी जायला निघाले. सासरची माहेरची मंडळी, राहूल, वैशाली, जोशी काका, सुषमा आणि नेर्लेकर, काशी आत्या आणि कंपनीतल्या सर्वांनी मला मदत केली. आधार दिला.


ऑपरेशन होण्या आधी हिंदुस्तान लिव्हरचे अंधेरी मधले सेंटर बंद करायच्या मार्गावर आहेत आणि काही जणांना बंगलोरच्या ऑफीस मध्ये पाठवणार आहेत अशी बातमी कळाली. जेव्हा एखादे युनिट बंद होते आणि दुसरीकडे हालवतात त्यात नोकरी जाण्याची दाट शक्यता असते. विनायकने दुसरी नोकरी शोधायला सुरवात केली. दरम्यान विनुचा एक मित्र तांडेल अमेरिकेवरून भारतभेटीसाठी आला होता आणि तो विनायकला भेटण्यासाठी आमच्या घरी आला. तो विनायकला म्हणाला की तू अजूनही अमेरिकेत post-doctorate करण्यासाठी जाऊ शकतोस. त्याने त्याच्या गाईडचा पत्ता दिला. त्यावेळेला नुकतेच इंटरनेट सुरू झाले होते म्हणून विनुने अमेरिकेत post-doctorate साठी अर्ज केला. हे शिक्षण नाही. त्यामुळे पदवी नाही. विद्यापिठात संशोधन करायचे. संशोधन केलेल्या कामाचे पेपर्स Scientific Journals मध्ये प्रकाशित होतात. दोघांचे भागेल इतपत शिष्यवृत्ती असते. गाईडचे लगेचच उत्तर आले. श्री गाडगीळ यांनी रेको दिली आणि विनुने वयाच्या ४० व्या वर्षी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला जावेच लागले. अन्नासाठी दाही दिशा म्हणतात ना ! कंपनीचा राजीनामा दिला आणि २००१ साली आम्ही अमेरिकेत आलो.हॉस्पिटलमध्ये असतानाच अमेरिकेचे बोलावणे आले. नंतरच्या भागात लिहीनच अमेरिकेतल्या घरांचे वर्णन व आठवणी. तोपर्यंत वाचत रहा. Copy Right Rohini Gore

क्रमश : ...


Thursday, April 04, 2024

सुंदर माझं घर ..... (३)

डोंबिवलीच्या आमच्याच घरात नाखुशीनेच पाय ठेवला. पेइंग गेस्ट लोकांनी आमची जागा अजिबातच चांगली ठेवली नव्हती. खूप कचरा फेकला आणि फरशी व ओटा खसाखसा घासून जागा स्वच्छ केली. जागेत फक्त एकच कॉट होती पूर्वी एखाद वर्ष विनू या जागेत राहिला होता तेंव्हाची. ही कॉट दोघांना झोपायला पुरेशी नव्हती. त्यामुळे खाली गाद्या घालूनच झोपत होतो. स्वैपाकाची सर्व भांडीकुंडी, डबे, ताटे, कपबशा बसेल अशी एक मांडणी आम्ही बाजारातून आणली. ही मांडणी ६ फूटी होती. मला खूपच आवडली होती. या मांडणीत कपबशाळे, ताटाळे होते. शिवाय झारे कालथे, चमचे अडकवून ठेवता येत होते. पातेल्या, सर्व डबे, अगदी छान बसले या मांडणीत. ओट्यावर गॅस ठेवला आणि आमची दैनंदिनी सुरू झाली. नंतर लगेचच मला काविळ झाली. कडक पथ्य सुरू झाले. उकडून भाज्या आणि हलका आहार सुरू झाला. प्रचंड प्रमाणात अशक्तपणा आला होता. पाणी उकळून व नंतर गार करून पीत होतो. नंतर काही दिवसांनी विनुला मलेरिया झाला. त्यालाही खूपच अशक्तपणा आला होता. डोंबिवली ही डासांकरता खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळी आठवणीने सर्व दारे खिडक्या बंद करून घ्यायला लागायची. डासांकरता गुडनाईटच्या वड्या वापरायला सुरवात केली.


मी विनुला म्हणाले की मी तुझा प्रिसिनॉपसिस टाईप करून देते. त्याकरता पाध्ये टाईपराईंटींग संस्थेत आम्ही टाईपराईटर भाड्याने घेतला. त्यावर ८-१० पानी प्रिसिनॉपसिस टाईप केला. पाध्ये यांना सांगून ठेवले की मला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. तुमच्या माहितीत कुठे व्हेकन्सी असली तर मला नक्की सांगा. आमच्या घराचा पत्ता लिहून दिला. त्यावेळी आमच्याकडे लॅंडलाईन फोन नव्हता. मोबाईलचा प्रश्नच येत नाही. विनायक त्याच्या गाईड कडे एका प्रोजेक्टवर काम करत होता त्यामुळे थोडेफार पैसे मिळत होते. त्याकरता तो आठवड्यातून २-३ वेळेला आयायटी मध्ये जात होता. आमच्या घरात विनायकने सतरंजीवर बसून त्याचा थिसीस लिहायला सुरवात केली. मी रोज देवपूजा करताना "देवा देवा मला नोकरी लागू दे" असा जप करत होते. देवाने माझे म्हणणे ऐकले. एके दिवशी दळण गिरणीत टाकले आणि एका दुकानात काहीतरी घेण्याकरता रत्यावरून जात होते. रस्त्यातच श्री पाध्ये मला भेटले आणि मला म्हणाले की बरे झाले तुम्ही भेटलात, मी तुमच्या घरीच यायला निघालो होतो. त्यांनी मला एव्हरी इंडिया लिमिटेडचे श्री देवधर ब्रांच मॅनेजरचे कार्ड दिले आणि सांगितले की डोंबिवली एम आय डी सी मध्ये ही कंपनी आहे तिथे एक व्हेकन्सी आहे. मला आनंद झाला. लगेचच दुसऱ्या दिवशी माझा एक बायोडाटा तयार करून टाईप केला आणि कंपनीत गेले. श्री देवधरांनी माझा बायोडाटा वाचला आणि लगेचच म्हणाले की या उद्यापासून. तुम्हाला ४ वर्षाचा अनुभव आहे. पदवीधर आहात. आणि तुम्हाला बाकीची स्किल्स पण आहेत म्हणजे टायपिंग शॉर्ट हॅंड, पंचिग. शिवाय तुम्ही आधीच्या कंपनीत काय काम केलेत हे पण सर्व लिहिले आहेत. आता अजून मी काय विचारणार? त्यांनी माझ्यासाठी चहा बिस्किटे मागवली. घरी कोण कोण असते विचारले. नवरा काय करतो? विचारल्यावर मी सांगितले की पिएचडी पूर्ण झाली आहे फक्त थिसीस लिहायचा बाकी आहे. त्यांनी लगेच भिवया उंचावल्या आणि म्हणाले व्हेरि गुड !


त्यांनी मला कंपनीची थोडीफार माहिती सांगितली आणि हे पण सांगितले की ही नोकरी कायमस्वरूपी नाही. रोज ५० रूपयेप्रमाणे तुम्हाला पगार मिळेल. आमच्या बाकीच्या ब्रांच मध्ये पण अशा टेंपररी पोझिशन्स आहेत. मी म्हणाले मला मंजूर आहे. मी कामावर रूजू होते. Avery India Limited मध्ये नोकरी मिळाल्यावर आम्हाला दोघांना खूप दिलासा मिळाला. मी विनुला म्हणाले की तू आता कोणतीच काळजी करू नकोस. शांत चित्ताने थिसीस लिही. माझी नोकरी ऑक्टोबर १९९० पासून सुरू झाली. माझा पगार खूप तुटपुंजा होता. वाण्याचे सामान, कामवाली बाई आणि अर्धा लिटर दूध, कामावर जाण्यासाठी जाताना रिक्शाचा खर्च यामध्ये भाजी आणण्याकरता इतके कमी पैसे उरायचे की मी बाजारात न जाता कोपऱ्यावर मिळणाऱ्या भाजीवाल्याकडे जायचे आणि फक्त ५ रूपयाची पावशेर भाजी विकत घ्यायचे. अर्ध्या लिटर दुधामध्ये फक्त २ वेळा चहा आणि सकाळी आम्हाला पिण्यापुरतेच असायचे. दूध पण खूप पातळ असायचे. रात्री मुगडाळीची खिचडी किंवा वरण भात असायचा. सोबत कोशिंबीर, पापड काहीही नसायचे. एखाद वेळेस मी कोशिंबीर करायचे. आम्ही रोजच्या रोज पैसे मोजायचो आणि महिना संपायला अजून किती दिवस बाकी आहेत तेही पहायचो. त्यावेळेला सर्वांनाच कॅश पगार दिले जात होते. मी कामावर जाताना रिक्षेने जायचे कारण आमच्या जवळच्या बस थांब्यावर बस कधीच थांबायची नाही. खूप भरून यायची. सुरवातीला मी मुख्य बस थांब्यावर जाण्यासाठी मी चालत जायचे पण गर्दी असायचीच.
या नोकरीमध्ये अधुन मधुन ब्रेक मिळेल असेही सांगितले होते. त्याप्रमाणे ३१ डिसेंबर ला मला ब्रेक मिळाला. आम्ही परत चिंतेत पडलो. पण २ दिवसातच बोलावणे आले. नंतर काही महिन्यांनी श्री देवधर यांनी पूर्ण १५०० मिळतील असे सांगितले. म्हणजे बरे वाटत नसताना मी कामावर गेले नाही तरी मला ५० रूपये त्या दिवसाचे मिळणार होते. श्री देवधर यांनी माझ्यासाठी "हिची कायमस्वरूपी नोकरी व्हावी" अशी शिफारस मुंबई मधल्या जनरल मॅनेजर कडे केली होती. त्यादिवशी मी ऑफीसममध्ये कुरियरची वाट पहात होते कारण माझे Appointment letter (कायमस्वरूपी) नोकरीचे येणार होते. मला पगार पण चांगला मिळाला असता. शिवाय सर्व बॅंक होलीडेज होते. शनिवारी हाफ डे असायचा. चांगल्या पगाराची कायमस्वरूपी नोकरी आणि ती सुद्धा गावातल्या गावात ! पण माझे नशिब इतके काही छान नव्हते. पत्र आले नाही. त्यामुळे मी खूप नाराज झाले. श्री देवधर म्हणाले मी काही करू शकत नाही. तुझी शिफारस करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही. १५०० रूपयांची गावातल्या गावात असलेली नोकरी सोडवत नव्हती. पण नंतर माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी 1993 साली नोकरीला बायबाय केले.
१९९१ डिसेंबर मध्ये विनायकला हिंदुस्तान लिव्हर - अंधेरी मध्ये (R & D ) सेक्शनला नोकरी लागली आणि आम्ही दोघेही कामावर जाऊ लागलो. विनायक कामावर जाताना डबा नेत नव्हता. मी माझ्यापुरती पोळी भाजी डब्यात घेऊन जायचे. आदल्या रात्री ड्रेस/साडी जी नेसायची असेल ती मी आधीच काढून इस्त्री करून ठेवायचे म्हणजे सकाळी घाई होत नसे. तसेच विनायकच्या शर्ट पॅंटला पण आदल्या दिवशीच इस्त्री करून ठेवायचे. जेव्हा मी एकटीच कामाला जायचे तेव्हा कामावरून आल्यावर विनु मला चहा करून द्यायचा. थिसीस लिहिताना अधुन मधुन ब्रेक घ्यायचा तेव्हा केरवारे करायचा. पूजा करायचा. धुणे-भांडी करायला इंदुबाई यायची. थिसीस लिहून पूर्ण झाल्यावर विनायकने तो एकाकडून इलेक्ट्रोनिक टाईपराईवर टाईप करुन घेतला. अर्थात पैसे देवूनच. त्यावेळेला लेझर प्रिंटिंग नवीनच होते. थिसीसमध्ये केमिस्ट्रीच्या आकृत्याही होत्या. ३३२ पानांचा जाडजूड थिसीस म्हणजे एक पुस्तकच ! मी उत्सुकतेने पाने उलटली पण मला ओ की ठो कळाले नाही. ऑरगेनिक केमिस्ट्रीची भाषा आणि आकृत्या! विनायकने थिसीस सुपूर्त केला. मी आयायटी मध्ये विनायकच्या पिएचडीच्या डिफेन्सला गेले होते. सर्वात मागे बसले होते. विनुचा थिसीस दोन ठिकाणी पाठवला होता. एक भारतामध्ये आणि एक अमेरिकेत. डिफेन्सला भारतातल्या आणि अमेरिकेतल्या परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची विनुने छान उत्तरे दिली. थोडक्यात तोंडी परिक्षा. डिफेन्स खूपच छान झाला पदवीदान समारंभाला विनायकला हजर रहाता आले नाही कारण नोकरी लागली होती.


पिएचडी झाल्यावर आम्ही आमच्या सोसायटीतल्या लोकांना पेढे दिले. एव्हरी इंडिया लिमिटेडचे ब्रांच मॅनेजर श्री देवधर यांना ठाण्यात त्यांच्या रहात्या घरी जाऊन पेढे दिले. आईनेही पेढे वाटले. आईबाबांनी विनुला टायटनचे घड्याळ व मला लाल रंगाची बडोदा सिल्कची साडी घेतली. हिंदुस्तान लिव्हर मध्ये interview ला गेल्यावर तिथल्या डॉक्टर नंबुदिरी यांनी विनायकला विचारले की आयायटी मधली सर्वजण अमेरिकेत जातात पोस्ट-डॉक्टरेट ( Post Doctorate ) करण्यासाठी. तुझा जर अमेरिकेत जायचा विचार असेल तर जॉइन होऊ नकोस. ते भलतेच खुश झाले होते विनायक वर !हिंदुस्तान लिव्हर मध्ये विनायकला चांगला पगार होताच पण इतर सुविधाही खूप छान होत्या. फक्त एकच होते येण्याजाण्याचा त्रास खूप होता. सकाळी १२ डब्याची लोकल त्याला ७.१२ ला पकडायला लागायची. डोंबिवली वरून घाटकोपरला उतरून अंधेरीत तिघे मिळून शेअर रिक्शाने जायचे. येताना मित्राबरोबर अंधेरी मुलुंड बसने व नंतर मुलुंड डोंबिवली ट्रेन ने. किंवा अंधेरी-दादर आणि दादर सेंट्रलला येऊन ट्रेनने डोंबिवली. येताना-जाताना खूपच गर्दी असायची. जेमतेम उभे रहायला मिळायचे. कामावरून येण्याची वेळ अनिश्चित होती त्यामुळे घरी यायला त्याला आठ ते साडे आठ होत असत. आल्या आल्या लगेच अंघोळ व चहा नाश्ता करायचा व थोड्यावेळाने जेवण.


शनिवारी अर्धा दिवस असल्याने ४ तासांकरता त्याचा पुर्ण दिवस वाया जायचा. आम्ही १० वर्षे डोंबिवली सोडून कुठेही बाहेर फिरायला पडलो नाही. विनुला जेमतेम एकच दिवस मिळायचा विश्रांतीसाठी. आमची करमणूक म्हणजे डोंबिवलीतल्या थिएटर वर सिनेमे पहाणे हिच होती. विनायकला नोकरी लागल्यावर पहिली खरेदी म्हणजे कपडे ठेवायला गोदरेजचे कपाट घेतले आणि व्होल्टाजचा फ्रीज घेतला. फ्रीज व गोदरेज कपाट कंपनीनेच दिले होते. (White goods) हॉलमध्ये कार्पेट घेतले आणि कोणी आले तर बसायला ४ खुर्च्या घेतल्या. दुधही वारणा/गोकुळ घेऊ लागले. घरीच दही, ताक, लोणी, तूप करू लागले. भाजी मार्केट मध्ये जाऊन भरपूर भाज्याही आणायचे. इंदुबाईला सर्व काम दिले होते म्हणजे धुणे-भांडी-केर-पोछा. नंतर काही दिवसांनी वॉशिंग मशीन घेतले. ते गुलाबी रंगाचे होते. १९९२ साली आम्ही दोघे गोव्याला ४ दिवसांच्या ट्रीपला गेलो. ही ट्रीप खूपच छान झाली.



एके वर्षी आम्ही कुलू मनालीला जायचे ठरवले. तिथे हिंदुस्तान लिव्हरचे guest house होते. महालक्ष्मी स्टेशनवरून दिल्लीला ट्रेन होती. मी जाण्यास इतकी उत्सुक नव्हते. माझे मन अस्वस्थ होते. काहीतरी वाईट घडणार असे सारखे वाटत होते. जे वाटत होते ते मी विनुला सांगितले नाही. शेजारच्या पारखी वहिनी मला म्हणाल्या अगं तू कुठे बाहेर फिरायला गेली नाहीस ना कधी म्हणून तुला असे वाटत असेल. बाहेर पडल्यावर तुला उत्साह येईल. मधे वाटेत खाण्यासाठी मी गोडाचा शिरा आणि तिखटामीठाच्या पुऱ्या करत होते. पारखीवहिनी मला मदत करत होत्या आणि सांगत होत्या की जा रोहिणी तू फिरायला मस्त एन्जॉय कर. दिल्लीला जाणारी ट्रेन रात्री १० ची होती. आम्ही आमच्या सामानासकट डोंबिवलीवरून महालक्ष्मी स्टेशनवर पोहचलो. आम्ही दोघांनी नुकतेच काही नवीन ड्रेस घेतले होते. एका आठवड्याची ट्रीप म्हणल्यावर ते सर्व नवीन ड्रेस बॅगेत भरले. एका पिशवीत खाण्यापिण्याचे सामान होते. वरच्या पर्स मध्ये १००० रूपये दिल्लीवरून पुढच्या प्रवासा साठी आणि खर्चाला ठेवले होते. ४००० रूपये बॅगेत ठेवले होते. महालक्ष्मीला दिल्लीला जाणारी ट्रेन लागली. गर्दी नव्हती. जरा विचित्रच वाटत होते. रेल्वेत आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो. आम्हाला समोरासमोर खिडकीजवळच्या जागा मिळाल्या होत्या. आम्ही आमच्या दोन्ही बॅगा आमच्या वर असलेल्या फळीवर ठेवल्या. प्रवासी येत होते पण जास्ती नव्हते. हमाल येवून प्रवासांच्या जड जड बॅगा वर ठेवत होते. रेल्वे रूळावरून हळूहळू जाऊ लागली. काही मिनिटांनी आता थोडे खाऊन घेऊ म्हणून वर पाहिले तर आमची बॅग नाही. पोटात धस्सच झाले. रिझर्वेशन केलेल्या त्या डब्यात आम्ही दोघेही आमची बॅग कुठे कुणी चुकून उचलून दुसरीकडे ठेवली आहे का ते पाहू लागलो. एका प्रवाशाला पुढचे स्टेशन कोणते ते विचारले तर त्याने सांगितले बोरिवली. मनात विचार आला की ट्रेनची चेन ओढायची का? पण नको. आता काय करायचे? एकच पर्याय होता तो म्हणजे बोरिवली स्टेशन वर उतरणे. खाण्याची पिशवी घेतली. पर्स माझ्याजवळच होती. बोरिवली स्टेशनला उतरून स्लो लोकलने आम्ही व्हाया दादर डोंबिवलीस मधरात्री आमच्या घरी आलो. प्रचंड भूक लागली होती. प्रवासात खायला घेतलेले घरीच खाल्ले. खूप रडायला आले मला. सकाळी आमचे घर उघडे कसे? म्हणून वर रहाणारे सुषमा आणि नेर्लेकर आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला खूप धीर दिला. प्रत्येक बाईला सिक्थ सेन्स असतो. तो माझा खूपच तीव्र आहे. विनायक म्हणाला तुला अस्वस्थ वाटत होते तर मला का नाही सांगितलेस? परत असे कधी वाटले तर मला सांगत जा. त्या घटनेपासून असे काही वाटत असेल तर मी त्याला लगेचच सांगते.


नोकरी लागल्यावर परत आमचा घराचा हफ्ता दादांना पाठवायला सुरवात झाली. १९९५ साली शेवटचा ५०,००० एकरकमी हफ्ता देऊन घराचे एक लाख वीस हजार कर्ज व्याजासकट फेडले. आम्हाला खूप समाधान वाटत होते. ही रक्कम आता खूप थोडी वाटेल पण त्यावेळेला खूप होती. १९९६ साली आमच्या घरी ओनिडा रंगीत टेलिविजन आला व घरच्याघरी थोडी करमणूक व्हायला लागली. एक दिवस चुन्यामध्ये थोडा रंग घालून सर्व फ्लॅटला रंग लावून घेतला. जेव्हा विनू थिसीस लिहीत होता तेव्हा आमच्याकडे अर्चना शिकायला यायची. श्री वाजपेयी जे आमच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून रहात होते ते आमच्या संपर्कात होते. त्यांच्या मित्राच्या मुलीला ९ वी मध्ये थोडे कमी मार्क मिळाले म्हणून वाजपेयींनी विनुला विचारले होते की अर्चनाचा अभ्यास घ्याल का? त्याप्रमाणे ती यायला लागली. तिच्या ओळखीने अजून ५-६ जणी येवू लागल्या. रविवारी सर्व जणी सकाळच्या यायच्या. मी सर्वांना खायला पोहे-उपमे करायचे. चहाही देत होते. विनुने अर्चनाला १० वी ते बीएससी पर्यंत सर्व विषय शिकविले. ती आमच्या घरी रोज अभ्यासाला यायची. विनु कामावरून आला की नंतर अर्चनाचा अभ्यास घेत होता. शनिवार रविवारही यायची. मी रोज संध्याकाळी तिची वाट बघायचे. ती पण आल्यावर विचारायची आज काय केले काकू खायला? रविवारी मी तिला आमच्याबरोबरच जेवायला बस असे सांगायचे. आम्ही दोघे पण तिच्या घरी शनिवार-रविवार कडे रात्री जेवायला जायचो. काकू नक्की या हं जेवायला असे बजावून सांगायची. अर्चना आमच्या घरातलीच एक होऊन गेली. अर्चनाची बहिण अदिती पण शिकायला यायची. अर्थात नंतर ती कॉमर्सला गेली. ती फक्त ९वी १०वी मध्ये होती तेव्हा यायची. त्या दोघींना आम्ही १० वी १२ वी झाल्यावर ड्रेसला कापड गिफ्ट म्हणुन दिले होते. गणपतीत आम्ही दोघे त्यांच्याच घरी जेवायचो. गणपतीचे आग्रहाचे निमंत्रण असायचे. शिवाय मला अर्चनाची आई नवरात्रात सवाष्ण म्हणून बोलवायच्या. अर्चना व इतर मुलींना विनुने फुकट शिकविले. तो म्हणाला विद्या नेहमी दान करावी. मलाही तेच वाटत होते.
नोकरी सोडल्यावर मी जेव्हा घरी होते तेव्हा अधुन मधून आमच्या शेजारच्या पारखी वहिनींबरोबर मी सकाळी बाजारात भाजी घ्यायला जायचे. दोघी घरी आलो की चहाबरोबर खारी खायचो. त्यादिवशी आम्ही दोघी एकत्रच जेवायचो. जेवण आमच्या घरीच व्हायचे. त्यांना माझ्या हातची मुगाच्या डाळीची खिचडी खूप आवडायची. मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर भाजलेला पोह्याचा पापड, खिचडीवर साजूक तूप आणि चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खव. शिवाय एका ताटलीत भरपूर गोल पातळ कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर व मुळ्याचे कापही करून ठेवायचे. नंतर सायीचे दही व ताजे ताक. असा आमच्या दोघीचा बाजारहाट खूप मजा देऊन जायचा. लिंबू सरबत, लोणची, मुरांबे गुळांबे करायला मला उत्साह आला होता.दळणांमध्ये गव्हाच्या पीठाबरोबर, डाळीचे, तांदुळाचे पीठ, अंबोळीचे पीठ आणि थालिपीठाची भाजणी आनंदाने करू लागले होते.


मी कंपनी सेक्रेटरीचा कोर्स केला पण माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे तो पूर्णत्वास नेला गेला नाही. नंतर मी सी-डॅकचा Advanced Diploma of Computer Programming चा कोर्स केला. १९९९ साली विनुला प्रमोशन मिळाले आणि आम्ही अंधेरी मधल्या कंपनीच्या क्वार्टर्स मध्ये रहायला गेलो. Copy Right - (Rohini Gore)

Sunday, March 31, 2024

स्वातंत्र्यवीर सावरकर

 सर्व भारतीयांनी पाहीलाच पाहिजे असा हा चित्रपट आहे. सर्व इतिहास दाखवला आहे. सर्व स्वातंत्र्यवीर दाखवले आहेत. गांधी, टिळक, गोखले, सुभाषचंद्र बोस, सेनापती बापट, कान्हेरे, चापेकर बंधू ,नथुराम गोडसे, मदनलाल धिंग्रा, भगतसिंग. सावरकर यांना इंग्लंडला जाण्यासाठी टिळक यांनी शिफारसपत्र दिले. शिवाय सावरकरांच्या बायकोच्या वडिलांनी पैशाची तरतुद केली. विदेशी वस्तुंची होळी दाखवली आहे. सावरकरांची समुद्रातली उडी दाखवली आहे. हुडा यांनी सावरकरांचा अभिनय तर चांगला केलेलाच आहे. शिवाय सिनेमाचे दिग्दर्शन अप्रतिम आहे. इतिहास दाखवणे हे सोपे काम नाही. काश्मिर फाईल्स, कलम ३७०, सॅम बहादुर हे सर्व सिनेमे विनायकला व मला दोघांनाही खूपच आवडले. पण सर्वार्थाने चांगला स्वातंत्र्यवीर सावरकर ! सर्व क्रांतीकारकांचा इतिहास दाखवला आहे हे खरच खूप विशेष आहे. काळ्या पाण्याची शिक्षा बघताना हृदय पिळवटून निघते आणि ओक्साबोक्शी रडायला येते. असे दाखवणे हे सोपे काम नाही. सर्व वडिलधाऱ्या भारतीयांनी तर हा सिनेमा पहावाच. सोबत पुढील पिढीला बघण्याचा आग्रह करावा. Rohini Gore